मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री गौतमी कपूर (Gautami Kapoor) ही केवळ तिच्या भूमिकांसाठीच नाही, तर तिच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. टीव्ही मालिका, चित्रपट आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर दमदार भूमिका साकारणाऱ्या गौतमीने अलीकडेच तिच्या बालपणीचा एक धक्कादायक अनुभव उघड केला आहे. हा अनुभव तिच्यासाठी इतका गंभीर होता की, तो सांगण्यासाठीही तिला वर्षानुवर्षे लागली.
Gautami Kapoor ने ‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ही घटना ती फक्त सहावीत असताना घडली होती. शाळा सुटल्यानंतर ती नेहमीप्रमाणे बसने घरी जात होती. प्रवासादरम्यान तिच्या शेजारी एक अनोळखी व्यक्ती येऊन बसला. सुरुवातीला काहीच संशय न आल्याने गौतमीने दुर्लक्ष केले, पण काही वेळातच त्या व्यक्तीने तिच्या पँटमध्ये हात टाकला.
“त्या क्षणी मी गोंधळून गेले. काय चाललंय तेच मला कळेना. वय लहान असल्यामुळे अशा गोष्टींची कल्पना नव्हती. मी स्थिरावूनच बसले होते, कारण मला कसं प्रतिसाद द्यायचं हेच सुचत नव्हतं,” असे गौतमीने सांगितले.
घटनेनंतर ती घाबरलेली असल्याने पुढच्या थांब्यावर उतरली. जवळपास १५-२० मिनिटे ती भीतीतच उभी होती. “माझ्या मनात सतत भीती होती की तो माणूस माझा पाठलाग करत असेल का?” असा प्रश्न तिला सतावत होता.
घरी पोहोचल्यावरही तिने आईला लगेच काही सांगितले नाही. लहान वय, लाज आणि भीती यामुळे ती शांत राहिली. मात्र काही वेळानंतर धाडस करून तिने आईला संपूर्ण घटना सांगितली.
हे पण वाचा.. Bigg Boss 19 मध्ये मराठी स्पर्धकांची एन्ट्री? अभिजीत सावंतच्या नावावर चर्चेचा केंद्रबिंदू
आईची प्रतिक्रिया मात्र आश्चर्यकारक होती. “तू घाबरण्याऐवजी त्याला कानाखाली मारायला हवे होते, त्याची कॉलर पकडायला हवे होती,” असा सल्ला आईने दिला. पुढे आईने तिला स्पष्ट सांगितले की अशा प्रसंगात अजिबात गप्प बसायचे नाही. “त्याचा हात घट्ट पकड, जोरात ओरड, गरज पडल्यास पेपर स्प्रे वापर किंवा पायातील बूट काढून हल्ला कर,” ही आईची शिकवण तिने आजतागायत लक्षात ठेवली आहे.
Gautami Kapoor म्हणते, “त्या घटनेने मला शिकवलं की अशा परिस्थितीत भीतीला बळी न पडता स्वतःचं संरक्षण कसं करायचं. अनेकदा समाजात मुलींना शांत राहण्याचा सल्ला दिला जातो, पण अशा वेळेस धैर्याने आवाज उठवणं हीच खरी ताकद आहे.”
हे पण वाचा.. “मला तिची भीती वाटते! ‘Tarini’ फेम प्रशांत केनीचा अभिज्ञा भावेसोबत कामाचा मजेशीर किस्सा”
Gautami Kapoor ने अभिनयाच्या माध्यमातून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘स्पेशल ऑप्स’ या वेब सिरीजमध्ये तिने हिंमत सिंहच्या (केके मेनन) पत्नीची भूमिका साकारून प्रेक्षकांचे लक्ष वेधले. तिच्या गंभीर आणि भावनिक अभिनयाची दाद मिळाली. अभिनयाच्या क्षेत्रात उत्तम कारकीर्द घडवतानाच ती एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणूनही ओळखली जाते.
वैयक्तिक आयुष्यात Gautami Kapoor ही अभिनेता राम कपूरची पत्नी असून, या दांपत्याला दोन मुले आहेत. कुटुंब, करिअर आणि समाजातील जबाबदारी यांचा उत्तम समतोल साधणाऱ्या गौतमीने दिलेला हा अनुभव समाजासाठीही एक महत्त्वाचा संदेश आहे—अन्याय सहन न करता त्याविरोधात उभे राहणे, हेच खरी ताकद आहे.









