ADVERTISEMENT

Vin Doghantali Hi Tutena’चा पहिला भाग प्रेक्षकांच्या पसंतीस; तेजश्री-सुबोधच्या केमिस्ट्रीची जोरदार चर्चा

वीण दोघांतली ही तुटेना’ (Vin Doghantali Hi Tutena) मालिकेच्या पहिल्या भागानेच प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला आहे. तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांच्या अप्रतिम अभिनयासह कथानकाची सुरुवात प्रेक्षकांना भावली असून सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Vin Doghantali Hi Tutena

मराठीवरील नवी मालिका ‘वीण दोघांतली ही तुटेना’ (Vin Doghantali Hi Tutena) नुकतीच प्रेक्षकांसमोर आली असून, पहिल्याच भागाने मालिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. टेलिव्हिजनवरील गाजलेल्या कलाकारांची जोडी – तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे – पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एकत्र दिसत आहेत. यामुळेच मालिकेच्या पहिल्या एपिसोडपूर्वीपासूनच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती.

Vin Doghantali Hi Tutena या मालिकेत तेजश्रीस्वानंदी’च्या भूमिकेत दिसत आहे. स्वानंदी ही मनमिळाऊ, घरातील प्रत्येकाच्या आनंदासाठी जगणारी, पण स्वतःच्या आयुष्यात अजून जोडीदार न मिळालेली एक स्वावलंबी मुलगी आहे. वयाच्या ३५व्या वर्षीही ती अविवाहित असून, एका ट्रॅव्हल कंपनीत काम करते. पहिल्याच भागात तिच्या मेहनतीचं फलित म्हणून कंपनीत तिला प्रमोशन मिळतं. या प्रसंगातून तिचा आत्मविश्वास आणि सकारात्मक स्वभाव अधोरेखित होतो.

दुसरीकडे, मालिकेचा नायक ‘समर राजवाडे’ (सुबोध भावे) एका थाटामाटात प्रेक्षकांसमोर येतो. आपल्या कुटुंबासाठी, विशेषतः बहिणी आणि भाचीसाठी तो मनापासून जिव्हाळा जपणारा आहे. भाचीच्या जन्माचा आनंद साजरा करण्यासाठी तो चक्क एक राजवाडा विकत घेतो. त्या राजवाड्यातील सोन्याचा बाऊल आणि चमचा त्याच्या बहिणीला विशेष आवडल्याने तोच अन्नप्राशन सोहळ्यात भेट म्हणून देण्याचा तो निर्णय घेतो.

कथानकाचा रोचक भाग म्हणजे, एपिसोडच्या शेवटी स्वानंदी आणि समर दोघेही एकाच वेळी मंदिरात येतात. मात्र, देवाकडे डोळे बंद करून प्रार्थना करत असल्यामुळे त्यांची प्रत्यक्ष भेट होत नाही. हा क्षण मालिकेतील आगामी घडामोडींविषयी प्रेक्षकांच्या कुतूहलात भर घालतो.

हे पण वाचा..खांद्याच्या दुखापतीतही अॅक्शन सीन; ‘तारिणी’ मालिकेबद्दल Shivani Sonar चा अनुभव आणि नवऱ्याची खास प्रतिक्रिया

पहिल्या भागानंतर सोशल मीडियावर प्रेक्षकांनी मालिकेचं भरभरून कौतुक केलं आहे. “पहिला भाग मस्त जमला”, “तेजश्रीला पाहून ‘होणार सून मी ह्या घरची’ची आठवण झाली”, “सुपरहिट होणार ही मालिका”, “कथानकाची सुरुवातच भावली”, अशा प्रतिक्रिया झी मराठीच्या पोस्टवर उमटल्या. अनेकांनी तेजश्री आणि सुबोध यांच्या अप्रतिम स्क्रीन प्रेझेन्स आणि नैसर्गिक अभिनयावर खास प्रेम व्यक्त केलं आहे.

Vin Doghantali Hi Tutena या मालिकेतल्या कथानकाची पहिली पायरी प्रेम, कुटुंब आणि नात्यांच्या जिव्हाळ्यावर आधारित आहे. त्यातले पात्र प्रेक्षकांच्या मनाशी जोडणारे असल्याचं पहिल्याच भागात स्पष्ट झालं आहे.

Vin Doghantali Hi Tutena ही मालिका रोज संध्याकाळी ७:३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, पहिल्याच भागाच्या यशावरून पुढील भागांबाबत प्रेक्षकांचा उत्साह अधिक वाढला आहे. तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांच्या या नव्या प्रवासाचा पुढचा टप्पा प्रेक्षकांसाठी नक्कीच रोचक ठरणार आहे.

हे पण वाचा.. Bigg Boss 19 मध्ये उपेंद्र लिमयेचा सहभाग? चर्चांना पूर्णविराम देत अभिनेत्याने दिलं स्पष्ट उत्तर