lagnanantar hoilch prem parth kavya prem nava valan : लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा अलीकडचा भाग भावनिक, धक्कादायक आणि भविष्यातील संघर्षाची चाहूल देणारा ठरला. काव्या शुद्धीवर येते आणि हे पाहून पार्थच्या चेहऱ्यावरचं समाधान लपून राहत नाही. तो आनंदात सर्वांना बोलवायला जातो, मात्र काव्या त्याला थांबवते. हा क्षण फक्त दोघांसाठी असावा, अशी तिची इच्छा असते. शरीर जरी थोडं कमजोर असलं तरी मनाला सावरण्यासाठी पार्थ जवळ असणं तिच्यासाठी महत्त्वाचं आहे, हे ती स्पष्टपणे व्यक्त करते. पार्थ तिचं म्हणणं समजून घेतो आणि तिच्या सोबत तो वेळ घालवतो.
या संवादातून काव्याला एक वेगळीच सुरक्षितता जाणवते. तिच्या भूतकाळासह पार्थने तिला स्वीकारलं आहे, याची जाणीव तिला आतून बळ देते. मात्र या आनंदात अचानक वास्तवाची जाणीव होते. काव्याला आठवतं की तिची परीक्षा आहे. ती तयारीबद्दल बोलते आणि तेवढ्यात पार्थ भावुक होतो. त्याच्या डोळ्यांत पाणी पाहून काव्या घाबरते. मग तो तिला सांगतो की ती कालपासून बेशुद्ध होती आणि परीक्षा आधीच सुरू झाली आहे. वर्षभराची मेहनत वाया गेल्याचं ऐकून काव्याला धक्का बसतो, पण ती स्वतःला सावरते.
दुसरीकडे, मानिनी काव्याची आतुरतेने वाट पाहत असते. काव्या घरी पोहोचते तेव्हा पार्थ, नंदिनी आणि जीवा तिच्यासोबत असतात. सगळ्यांचं ओवाळणं होतं. वरून हे दृश्य पाहणाऱ्या वसू आणि रम्याच्या मनात मात्र वेगळ्याच भावना असतात. काव्या सुखरूप परतल्याने रम्याच्या अस्वस्थतेत वाढ होते. काव्याला मात्र आई-वडील जवळ पाहून आणि घरात परत आल्यावर मनापासून बरं वाटतं.
काव्याला रूमपर्यंत चालता येईल का, असा प्रश्न मानिनी विचारते. त्यावर पार्थ थेट तिला उचलून घेतो. सगळ्यांसमोर तो जाहीर करतो की आजपासून त्यांच्या आयुष्याचा नवा प्रवास सुरू होत आहे. हा क्षण म्हणजे पार्थकडून काव्याचा पूर्ण स्वीकार असतो. हे दृश्य पाहून रम्याच्या पायाखालची जमीन सरकते. वसू तिला शांत करण्याचा प्रयत्न करते, मात्र रम्या हट्टाने पार्थसोबत हनिमूनला जाण्याची भाषा करते आणि मनात काहीतरी कट रचत असल्याचे संकेत देते.
हे पण वाचा.. महेश मांजरेकरांची मानलेली लेक मराठी सिनेसृष्टीत का ठरतेय चर्चेचा विषय?
रूममध्ये गेल्यावर काव्या भावुकपणे सांगते की इतके दिवस खिडकीतून पाहिलेलं स्वप्न आज प्रत्यक्षात जगते आहे. परीक्षा हुकल्याची आठवण पुन्हा येते, पण ती हार मानत नाही. यंदा नाही जमलं, तरी पुढच्या वर्षी ती नक्की यश मिळवेल, असा ठाम निर्धार ती करते. या प्रवासात पार्थची साथ हवी आहे, इतकंच तिचं मागणं असतं. तिचा आत्मविश्वास पाहून पार्थलाही दिलासा मिळतो. Lagnanantar Hoilch Prem ची कथा आता प्रेम, संघर्ष आणि आगामी मोठ्या ट्विस्टकडे वेगाने वाटचाल करत असल्याचं स्पष्ट दिसत आहे.
हे पण वाचा.. डेटिंग अँप पासून लग्नापर्यंतचा प्रवास; गायत्री दातार आणि श्रीकांत चवरे यांची खास लव्हस्टोरी चर्चेत









