star pravah kon hotis tu kay zhalis tu serial off air : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘कोण होतीस तू, काय झालीस तू!’ ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. २८ एप्रिल २०२५ रोजी सुरू झालेल्या या मालिकेकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा होत्या. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं!’ या गाजलेल्या मालिकेनंतर गौरी-जयदीपची लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एकत्र झळकणार, यामुळे सुरुवातीपासूनच या मालिकेची चर्चा होती. गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव पुन्हा एकत्र पाहायला मिळणार, ही बाबही चाहत्यांसाठी खास ठरली होती.
सुरुवातीला या मालिकेला रात्री आठ वाजताचा प्राइम टाइम स्लॉट देण्यात आला होता. मात्र, टीआरपी आणि वाहिनीच्या नियोजनानुसार मालिकेच्या वेळेत वारंवार बदल झाले. कधी रात्री अकरा, तर सध्या साडेदहा वाजता ही मालिका प्रसारित होत होती. आता मात्र अवघ्या आठ महिन्यांतच ही मालिका पूर्णविराम घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. स्टार प्रवाहवर मधुराणी प्रभुलकरची नवीन मालिका सुरू होत असल्याने वाहिनीने आपल्या वेळापत्रकात काही महत्त्वाचे बदल केले आहेत.
या बदलांनुसार रेश्मा शिंदेची ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका रात्री १०:३० वाजताच्या स्लॉटला दाखवली जाणार आहे. त्यामुळे यश-कावेरीची ‘कोण होतीस तू, काय झालीस तू!’ ही मालिका ऑफ एअर जाणार आहे. या मालिकेचा शेवट कसा होणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. त्याची झलक अभिनेत्री Nandini Vaidya यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमधून समोर आली आहे.
नंदिनी वैद्य या मालिकेत पूर्णिमा ही महत्त्वाची भूमिका साकारत होत्या. नुकतंच शेवटच्या भागाचं शूटिंग पूर्ण झालं असून सेटवरील एक भावनिक व्हिडीओ त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मालिकेच्या शेवटच्या दृश्यांची झलक दिसते. कथानकानुसार यश आणि कावेरीचा लग्नसोहळा पार पडतो आणि ‘माँ’ अखेर या दोघांचा स्वीकार करतात. यानंतर विद्या सगळ्यांना एकत्र येऊन फोटो काढण्याचा आग्रह करते. सगळेजण सेल्फी मोडमध्ये एकत्र येतात आणि हसतमुख क्षणात मालिकेचा शेवट होतो.
हा व्हिडीओ शेअर करताना नंदिनी वैद्य यांनी एक भावूक पोस्ट लिहिली आहे. “प्रत्येक शेवट ही नव्या सुरुवातीची नांदी असते. प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमासाठी मनापासून धन्यवाद. ही कृतज्ञता शब्दांत व्यक्त करणं कठीण आहे. लवकरच पुन्हा भेटू,” असं म्हणत त्यांनी चाहत्यांना २०२६ साठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
हे पण वाचा.. प्रेमासाठी सगळी सीमा ओलांडणार! लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत जिवा–काव्याचं ‘लग्नासाठी कायपण’ मिशन सुरू
दरम्यान, ५ जानेवारीपासून स्टार प्रवाहवर सायंकाळी ७:३० वाजता ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही नवी मालिका सुरू होणार आहे. त्यामुळे वाहिनीच्या वेळापत्रकात नवा अध्याय सुरू होत असतानाच ‘कोण होतीस तू, काय झालीस तू!’ ही मालिका आठवणींचा ठेवा बनून प्रेक्षकांच्या मनात राहणार आहे.
हे पण वाचा.. रिंकू राजगुरूचा लावणी डान्स व्हायरल, नऊवारीत केलं भन्नाट सादरीकरण









