Paru Fame Prasad Jawade mother passes away : मराठी मनोरंजनविश्वातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेता Prasad Jawade यांच्या आई प्रज्ञा जवादे यांचं निधन झालं आहे. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही वर्षांपासून त्या कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होत्या. त्यांच्या निधनामुळे जवादे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून कलाकार आणि चाहत्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे.
ही दु:खद माहिती Prasad Jawade यांची पत्नी आणि अभिनेत्री अमृता देशमुख हिने सोशल मीडियावर शेअर केली. इन्स्टाग्राम पोस्टद्वारे तिने प्रज्ञा जवादे यांच्या निधनाची बातमी देत भावना व्यक्त केल्या. अमृताने लिहिलं की, कर्करोगासारख्या आजाराशी त्यांनी मोठ्या धैर्याने आणि सकारात्मकतेने लढा दिला. त्या शांत, प्रेमळ आणि कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या होत्या. “मम्मी, आम्हा सर्वांना तुमची खूप आठवण येतेय,” असे भावनिक शब्द तिने या पोस्टमध्ये नमूद केले.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या झी मराठी पुरस्कार सोहळ्यात Prasad Jawade यांनी स्वतःच्या आयुष्यातील हा कठीण टप्पा प्रेक्षकांसमोर मांडला होता. त्या कार्यक्रमात त्यांना ‘सर्वोत्कृष्ट मुलगा’ हा विशेष पुरस्कार देण्यात आला होता. या पुरस्कार सोहळ्याला त्यांचे कुटुंबीय अचानक मंचावर आले आणि आईला पाहताच प्रसाद भावूक झाले होते. त्या क्षणी संपूर्ण सभागृह भावनांनी भरून गेलं होतं.
याच कार्यक्रमात प्रसाद यांच्या आईंनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं होतं की, कर्करोगाचं निदान झाल्यानंतरही प्रसाद खचला नाही. त्याने श्रावणबाळासारखी त्यांची सेवा केली. रुग्णालयात सगळेच त्याला प्रेमाने ‘श्रावणबाळ’ म्हणायचे, असंही त्यांनी अभिमानाने सांगितलं होतं. आधुनिक काळातील श्रावणबाळ म्हणजेच Prasad Jawade, असं म्हणत त्यांनी आपल्या मुलाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती.
२०२४ च्या दिवाळीत प्रज्ञा जवादे यांना कॅन्सरचं निदान झालं होतं. मुलाने अभिनय क्षेत्रात भरभराट करावी, ही त्यांची मनापासून इच्छा होती. त्यामुळे एकीकडे ‘पारू’ मालिकेचं शूटिंग सुरू असतानाच प्रसादने आईच्या उपचारांची जबाबदारीही समर्थपणे पेलली.
हे पण वाचा.. रमाच्या लग्नात मुकादमांची वरात! मुरांबा मालिकेचा प्रोमो चर्चेत
कामाच्या बाबतीत सांगायचं झालं तर Prasad Jawade सध्या ‘पारू’ मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहे. यापूर्वी त्याने ‘कन्यादान’, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘कुलस्वामिनी’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्येही काम केलं आहे. आईच्या निधनामुळे प्रसाद आणि त्यांच्या कुटुंबावर ओढवलेल्या या दुःखात संपूर्ण मराठी मनोरंजनसृष्टी सहभागी असून अनेक कलाकारांनी त्यांना धीर दिला आहे.
हे पण वाचा..‘धुरंधर’ची जादू कायम! मालिकेतील अभिनेत्याने गायलेलं गाणं ठरतंय सोशल मीडियावर हिट
Paru Fame Prasad Jawade mother passes away








