bigg boss marathi 6 theme ritesh deshmukh promo : मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात चर्चेत असलेला रिऍलिटी शो Bigg Boss Marathi 6 अखेर नव्या अवतारात प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झाला आहे. शोचा पहिला दमदार प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून, या प्रोमोमधून यंदाच्या सीझनची थीम स्पष्ट करण्यात आली आहे. “दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार!” या प्रभावी वाक्यानेच या सीझनचा मूड ठरवण्यात आला आहे. यंदाचा खेळ फक्त मनोरंजनापुरता न राहता, स्पर्धकांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरणार असल्याचं संकेत मिळत आहेत.
Bigg Boss Marathi 6 च्या प्रोमोचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे रितेश देशमुख. रितेश भाऊंचा स्वॅग, त्यांची संवादफेक आणि कोड्यातून दिलेली हिंट यामुळे प्रोमो अधिकच गूढ बनला आहे. “फॅन्सचा जीव जडला की ते पाठ सोडत नाहीत, आणि मी शब्द दिला की मागे हटत नाही,” अशा ठाम शब्दांत त्यांनी यंदाचा खेळ वेगळा असणार याचा इशारा दिला आहे. दारापलीकडे काय दडलंय, कोणाचं नशीब उजळणार आणि कोण अडचणीत सापडणार, हे दार उघडल्यावरच कळणार आहे.
या नव्या सीझनमध्ये बिग बॉसचं घरही तितकंच भव्य आणि अनपेक्षित असणार आहे. शेकडो दारं-खिडक्या, वेगवेगळे मार्ग आणि प्रत्येक दारामागे लपलेला ट्विस्ट—असं चित्र प्रोमोमधून उभं राहतं. प्रत्येक क्षणाला खेळाची दिशा बदलू शकते, असा स्पष्ट संकेत रितेश देशमुख देतात. त्यामुळे स्पर्धकांना केवळ टास्कच नव्हे, तर नशीब आणि निर्णयांची कसोटीही द्यावी लागणार आहे.
Bigg Boss Marathi 6 मुळे संपूर्ण महाराष्ट्रात उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालं आहे. घराची रचना नेमकी कशी असेल, कोणते नवे नियम लागू होतील आणि दारापल्याडचं सरप्राइज काय असेल, याबाबत प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगू लागल्या आहेत. रितेश भाऊंच्या हटके लूकसह सादर करण्यात आलेला हा प्रोमो सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळणार आहेत. Bigg Boss Marathi 6 चा ग्रँड प्रीमियर ११ जानेवारीला रात्री ८ वाजता होणार असून, हा शो कलर्स मराठी वाहिनीवर आणि जिओहॉटस्टारवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. यंदाचा सीझन थरार, भावना आणि अनपेक्षित वळणांनी भरलेला असणार, यात शंका नाही.
हे पण वाचा.. मुंबईतील फ्लॅटला भीषण आग; मराठी अभिनेता पुष्कर जोग थोडक्यात बचावला, घर पूर्णतः जळून खाक









