kamali serial hrushi anika engagement twist : झी मराठी वरील कमळी (Kamali) मालिकेत गेल्या काही भागांपासून प्रेक्षकांना एकापाठी एक जोरदार ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. हृषी आणि अनिकाच्या मतभेदांमुळे निर्माण झालेली दरी आता आणखी गहिरी होत चालली आहे. काही दिवसांपूर्वीच अनिकाने हृषीसमोर आपल्या भावनांची कबुली देत खास सरप्राईजची व्यवस्था केली होती, पण हृषीच्या मनात तिच्यासाठी कोणत्याही भावना नसल्यामुळे प्रसंग चिघळला. रागाच्या भरात त्याने अनिकाला सुनावलंही. या प्रकाराबद्दल आता कामिनी आणि रागिणीला माहिती मिळताच गोष्ट वेगळ्या दिशेने वळू लागली आहे.
कामिनीला ठाम विश्वास आहे की काहीही झालं तरी हृषी आणि अनिकाचा साखरपुडा व्हायलाच हवा. हा निर्णय पक्का करत ती थेट इनामदारांच्या घरी पोहोचते. प्रथम ती नयनतारासमोर अनिका–हृषीच्या लग्नाचा प्रस्ताव मांडते; मात्र या नात्याला नयनतारा सरळ नकार देते. अनिकाला आपल्या घरात सून म्हणून स्वीकारणं तिला अजिबात पटत नसतं.
मात्र कामिनीकडे यावेळी एक गुप्त शस्त्र असतं—एक व्हिडीओ! काही दिवसांपूर्वी हृषीची बहीण प्राजक्तासोबत झालेल्या गैरवर्तनाची माहिती आणि त्याचा व्हिडीओ तिच्या हाती लागतो. हा मुद्दा नयनतारासमोर ठेवून कामिनी तिला स्पष्ट धमकी देते की हा व्हिडीओ बाहेर आला तर घराची प्रतिष्ठा धोक्यात येईल. हा व्हिडीओ पाहताच नयनतारा हादरते आणि अनिच्छेने का होईना, या लग्नाला मान्यता देण्याशिवाय पर्याय उरत नाही.
आता पुढचा प्रश्न असा की हृषी स्वतः अनिकाशी लग्नासाठी तयार होईल का? कामिनीचा डाव किती दूरपर्यंत जाणार? आणि या सगळ्या गोंधळात कमळीची भूमिका काय असणार?
याचवेळी मालिकेतील आणखी एक महत्त्वाचा भाग उलगडू पाहतोय. अन्नपूर्णा आजी कमळीला तिच्या आईबद्दल – गौरीबद्दल सत्य सांगण्याचा निर्णय घेते. कमळीला इतके दिवस ‘सरोज’ म्हणून परिचित असलेली स्त्रीच प्रत्यक्षात गौरी असून तिचा राजनसोबतचा भूतकाळ हळूहळू समोर येऊ लागतो. कमळीला या नात्याचं सत्य कधी आणि कसं उमगणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
आगामी भागांमध्ये कमळी मालिकेत अनिकाचा साखरपुडा, हृषीचा निर्णय आणि कमळीच्या आयुष्याचं उलगडत जाणारं सत्य—हे तिहेरी नाट्य प्रेक्षकांना खिळवून ठेवेल, हे निश्चित.
हे पण वाचा.. सूरज चव्हाण लग्नसोहळ्याची धांदल सुरू; संजना गोफणेच्या घरी घाणा भरण्याचा रंगतदार सोहळा







