बिग बॉस मराठीमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता Shiv Thakare एका धक्कादायक घटनेमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. मुंबईतील त्याच्या फ्लॅटमध्ये मंगळवारी अचानक आग लागल्याने मोठे नुकसान झाले. ही घटना शॉर्ट सर्किटमुळे घडल्याचे प्राथमिक अंदाज असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली. मात्र या प्रसंगावेळी Shiv Thakare स्वतः घरातच असल्याची माहिती त्याने दिल्यानंतर चाहत्यांमध्ये अधिकच खळबळ माजली आहे.
शिवने सांगितले की आग लागतानाचे क्षण त्याच्यासाठी हादरवून टाकणारे होते. “पहिले दहा सेकंद मला काहीच समजलं नाही. काय झालं, कसं झालं, काहीच कळेना. धूर आणि जळण्याचा वास येऊ लागला तसा मी लगेच माझ्या मित्राला फोन केला आणि नंतर फायर ब्रिगेडला संपर्क साधला,” असे तो म्हणाला. फायर ब्रिगेडचे जवान पाच मिनिटांत पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
या सोसायटीतील सुरक्षा यंत्रणेबद्दल मात्र Shiv Thakare ने गंभीर प्रश्न उपस्थित केले. आग लागली तरी सायरन वाजला नाही, पाण्याची व्यवस्था सुरू झाली नाही, आणि तांत्रिक दोषांची जबाबदारी कोण स्वीकारणार हेही स्पष्ट नव्हते. “सोसायटी व्यवस्थापन एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहे. बिल्डर वेगळे बोलतो, मॅनेजमेंट वेगळं. इतक्या मोठ्या इमारतीत अशा सुरक्षेचं काय औचित्य?” अशी तीव्र नाराजी त्याने व्यक्त केली.
शिवने सांगितले की आग हॉलमध्येच थांबली, हा नशिबाचा भाग. “ही आग जर बेडरुमपर्यंत आली असती तर मला बाहेर पडणंही शक्य झालं नसतं,” असे तो म्हणाला. घटनेनंतर बिल्डिंगमधील ज्येष्ठ रहिवाशांनीही शिवला भेटून अशाच तक्रारी पूर्वीपासून करत असल्याचे सांगितले. त्यांनी विचारलेला प्रश्नही तितकाच गंभीर — “कोणाचा जीव गेल्यावरच लक्ष देणार का?”
मालेगाव प्रकरणावर शशांक केतकरची बायको प्रियंकाचा संताप; मनाली या विकृत लोकांना..
या घटनेमुळे शिव ठाकरेच्या घराचे बरेच नुकसान झाले असले, तरी त्याचे प्राण वाचले ही सर्वात महत्त्वाची बाब. मात्र या संपूर्ण प्रकरणाने मुंबईतील उंच इमारतींमधील सुरक्षेची वास्तविकता पुन्हा एकदा समोर आणली आहे. शिवने मांडलेले प्रश्न अनेकांना विचार करायला लावणारे आहेत.








