snehlata vasaikar exit from serial sheetal kshirsagar new maisaheb : मराठी मनोरंजन क्षेत्रातील दमदार उपस्थिती राखणारी आणि विविध ऐतिहासिक मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकणारी स्नेहलता वसईकर (Snehlata Vasaikar) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ यांसारख्या मालिकांमधील मजबूत भूमिका आणि ‘बिग बॉस मराठी’तील सहभागामुळे तिचा चाहतावर्ग नेहमीच उत्सुकतेने तिच्या कामाकडे पाहत असतो. गेल्या काही महिन्यांपासून ती सन मराठीवरील ‘तुझ्यासाठी तुझ्यासंग’ या मालिकेत माईसाहेबांच्या प्रभावी भूमिकेत झळकत होती. मात्र आता तिने या मालिकेला निरोप दिल्याची माहिती समोर आली असून चाहते याबाबत विविध चर्चा करताना दिसत आहेत.
‘तुझ्यासाठी तुझ्यासंग’ ही मालिका १४ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि अल्पावधीतच लोकप्रियही झाली. अशोक फळदेसाई आणि अनुष्का गीते यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेत स्नेहलता वसईकर द्वारा साकारलेले माईसाहेबांचे पात्र विशेष लक्षवेधी ठरले. कडक स्वभाव, प्रभावी वागणूक आणि दमदार स्क्रीन प्रेझेन्समुळे हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. मात्र, अलीकडेच प्रदर्शित झालेल्या नवीन प्रोमोमध्ये स्नेहलता दिसून न आल्याने तिच्या एक्झिटची पुष्टी झाली.
आता तिच्या जागी या भूमिकेत अभिनेत्री शीतल क्षीरसागरची एंट्री झाली आहे. ‘का रे दुरावा’, ‘नवरी मिळे हिटलरला’, ‘रमा राघव’ यांसारख्या मालिकांमधून शीतलने आपली ओळख आधीच मजबूत केली आहे. त्यामुळे माईसाहेबांच्या भूमिकेत तिचे आगमन प्रेक्षकांसाठी एक नवा अनुभव ठरणार आहे. सन मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये शीतल एका दमदार अंदाजात दिसत असून अनेकांनी तिच्या एन्ट्रीचे स्वागत केले आहे. तरीही काही चाहत्यांनी “जुन्या माईसाहेबांना का बदललं?” असा सवाल कमेंट्समध्ये विचारत नाराजीही व्यक्त केली आहे.
हे पण वाचा.. स्टार प्रवाहवर बदलांची घोषणा! ‘काजळमाया’ आणि ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ मालिकांच्या वेळेत मोठा बदल
दरम्यान, ‘तुझ्यासाठी तुझ्यासंग’ ही मालिका दररोज रात्री ९:१५ वाजता प्रसारित होते. स्नेहलता वसईकर च्या अचानक एक्झिटमुळे मालिकेच्या कथानकात कोणते बदल पाहायला मिळणार, आणि शीतल क्षीरसागर हे नवे पात्र कसे उभे करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे पण वाचा.. गुरू दिवेकर एक्झिट: सावळ्याची जणू सावलीत रुचिर गुरवची रिप्लेसमेंट एंट्री









