nishad bhoir gondhal Marathi cinema poster : ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतून घराघरात ओळख निर्माण करणारा अभिनेता निशाद भोईर (Nishad Bhoir) आता रुपेरी पडद्यावर दमदार एन्ट्रीसाठी सज्ज झाला आहे. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘गोंधळ’ या मराठी सिनेमात निशादची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्याकडे झालेला त्याचा हा प्रवास अनेक नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
‘गोंधळ’ या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाली असून प्रेक्षकांच्या उत्सुकतेला चांगलंच उधाण आलं आहे. लोककलेचा सुगंध, पारंपरिक संस्कृती आणि आधुनिकतेचा संगम दाखवणारा हा सिनेमा मराठी प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव ठरणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे पोस्टर आता लोकल ट्रेनमध्येही लागले असून, प्रवासादरम्यान स्वतःच्या व्यक्तिरेखेचं पोस्टर पाहून निशाद भोईर क्षणभर थक्क झाला. त्या भावूक क्षणाचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या.
“करिअरसाठी ही एक छोटी स्टेप असली, तरी माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. माझ्या पहिल्या सिनेमाचं पोस्टर ट्रेनमध्ये पाहताना मन अभिमानाने भरून आलं. या संधीसाठी संपूर्ण टीमचे मनापासून आभार,” असं निशाद भोईरने पोस्टमध्ये लिहिलं आहे.
निशादने यापूर्वी ‘सावळ्याची जणू सावली’, ‘निवेदिता माझी ताई’, ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’, ‘दख्खनचा राजा जोतिबा’ आणि ‘आई मायेचं कवच’ या लोकप्रिय मालिकांमधून अभिनय साकारला आहे. त्याच्या सहज अभिनयशैलीमुळे तो प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला आहे. आता ‘गोंधळ’च्या माध्यमातून तो सिनेमात आपलं वेगळं स्थान निर्माण करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, अनुज प्रभू, माधवी जुवेकर, सुरेश विश्वकर्मा, कैलाश वाघमारे यांसारख्या दमदार कलाकारांचाही सहभाग आहे. ग्रामीण मातीत रुजलेली कथा, संगीत आणि कलात्मक सादरीकरणामुळे ‘गोंधळ’ हा सिनेमा प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने मराठी संस्कृतीचा अनुभव देईल.
हे पण वाचा.. कमळी फेम केतकी कुलकर्णीला लहानपणी होता दुर्मीळ आजार; अभिनेत्रीच्या आईने सांगितला भावनिक अनुभव
१४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणारा ‘गोंधळ’ सिनेमा हा निशाद भोईरच्या करिअरमधील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर झेप घेताना त्याने दाखवलेली मेहनत आणि जिद्द पाहून त्याचे चाहते त्याला मनापासून शुभेच्छा देत आहेत.
हे पण वाचा.. लग्नाच्या वाढदिवशीच हक्काचं घर! पुष्कर सरद आणि अमृता चंद्रप्रभा यांच्या स्वप्नपूर्तीचा खास क्षण









