nilesh sable new show vahinisaheb superstar : मराठी मनोरंजनविश्वात एक वेगळा ठसा उमटवणारा कलाकार म्हणजे निलेश साबळे. झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ मधून तो प्रेक्षकांच्या मनात कायमचा घर करून गेला. डॉक्टर म्हणून कारकिर्दीची सुरुवात करून अभिनय, लेखन, दिग्दर्शन आणि सूत्रसंचालन या सर्व क्षेत्रांत आपलं बहुगुणी व्यक्तिमत्त्व दाखवणारा हा कलाकार आता पुन्हा नव्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येत आहे.
निलेश साबळेने अलीकडेच आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यातून त्याच्या नवीन प्रकल्पाची झलक मिळाली आहे. त्या पोस्टरवर त्याचा फोटो असून वरती ठळक अक्षरांत ‘वहिनीसाहेब सुपरस्टार’ असे लिहिलेले आहे. पोस्टरवर “धमाल खेळ, गप्पा, कॉमेडी, संगीत आणि बरंच काही” अशा शब्दांत कार्यक्रमाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या नव्या शोचं सूत्रसंचालन स्वतः निलेश करणार असून, त्याच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी ठरणार आहे.
ही पोस्ट शेअर करताना निलेशने “महाराष्ट्रातील तमाम आदरणीय वहिनींसाठी एक आगळा वेगळा शो…” असे लिहित कॅप्शन दिले आहे. या पोस्टनंतर नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. काहींनी त्याच्या नव्या शोसाठी उत्साह व्यक्त केला आहे, तर काहींनी पुन्हा एकदा निलेशला पाहायला मिळणार असल्याचं आनंदाने सांगितलं आहे.
गेल्या काही वर्षांत निलेश साबळे अनेक कार्यक्रमांमधून प्रेक्षकांना भेटला आहे. ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’, ‘कॉमेडी आणि बरंच काही’, ‘नवरा माझा भवरा’ यांसारख्या कार्यक्रमांमधून त्याने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. अलीकडेच तो ‘ढिंच्याक दिवाळी २०२५’ या स्टार प्रवाहवरील विशेष कार्यक्रमात दिसला होता, जिथे भाऊ कदम, पंढरीनाथ कांबळे, विशाखा सुभेदार यांच्यासोबत त्याने प्रेक्षकांना हसवले होते.
दरम्यान, ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाचे दुसरे पर्व सध्या झी मराठीवर प्रसारित होत आहे. या सीझनमध्ये कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, गौरव मोरे, भारत गणेशपुरे आणि प्रियदर्शन जाधव हे कलाकार झळकत आहेत, तर सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिजीत खांडकेकर सांभाळत आहे. या नव्या पर्वालादेखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असला, तरी निलेशच्या अनुपस्थितीची चर्चा सोशल मीडियावर जोरात होती.
हे पण वाचा.. “‘तुला जपणार आहे’ फेम तनिष्का विशे: बॅकग्राउंड डान्सरपासून अभिनेत्रीपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास!”
आता मात्र निलेश साबळे पुन्हा एकदा स्वतःच्या खास विनोदी आणि मनोरंजक शैलीत ‘वहिनीसाहेब सुपरस्टार’ या नव्या शोमधून छोट्या पडद्यावर परत येतो आहे. या कार्यक्रमातून तो पुन्हा प्रेक्षकांना हसवणार, भावनांशी जोडणार आणि मनोरंजनाचा नवा अध्याय सुरू करणार, अशी चाहत्यांची मोठी अपेक्षा आहे.
हे पण वाचा.. “ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करायला शिकलंय मी…” – स्पृहा जोशीचं मनोगत सोशल मीडियावरील नकारात्मकतेवर खुलं वक्तव्य









