filmfare chhaya kadam emotional moment : ७० व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात मराठी अभिनेत्री Chhaya Kadam यांनी एक ऐतिहासिक क्षण अनुभवला. ‘लापता लेडीज’ या चित्रपटातील मंजू माई या दमदार भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा सन्मान मिळाला. या मोठ्या यशानंतर त्यांनी आपला आनंद, संघर्ष आणि भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केल्या. मंचावर आणि पोस्टमध्ये त्यांनी व्यक्त केलेलं हे मनोगत अनेकांच्या मनाला भिडणारं ठरलं आहे.
छाया कदम यांनी सांगितलं की, फिल्मफेअर हा पुरस्कार म्हणजे प्रत्येक कलाकारासाठीचं एक स्वप्न असतं. “फिल्मफेअरच्या या सोहळ्यात उभं राहणं म्हणजे माझ्यातल्या छोट्या लेकराला जणू आभाळाला हात लावल्यासारखं वाटलं,” असं त्या म्हणाल्या. ‘लापता लेडीज’मधील मंजू माई ही भूमिका त्यांच्यासाठी फक्त अभिनय नव्हता, तर त्यांच्या आतापर्यंतच्या संपूर्ण कलाप्रवासाचं सार होतं.
किरण राव यांच्या दिग्दर्शनात त्यांनी साकारलेली ही भूमिका किती महत्त्वाची होती, हे सांगताना त्या म्हणाल्या, “किरण राव यांनी माझ्यात मंजू माई पाहिली, माझ्यावर विश्वास ठेवला आणि ही भूमिका मला दिली. त्या विश्वासानेच मी स्वतःला या भूमिकेत ओतून दिलं.”
त्यांनी पुढे सांगितलं की, पुरस्कार मिळण्याआधी अनेकदा वाटायचं की आता आपलं नाव घेतलं जाईल, पण तसं होत नव्हतं. “यावेळी ठरवलं होतं की पुरस्कार मिळो वा न मिळो, मंचावर हसतमुखानं जायचं. आणि मग मंजू माईनं माझा हात धरून मला इथं आणलं,” असं छाया कदम यांनी भावूक होत सांगितलं.
पुरस्कार समारंभात त्यांना Shah Rukh Khan यांच्या हातून गौरव मिळाला. “शाहरुखने दिलेली मिठी आणि कपाळावर घेतलेलं चुंबन हे माझ्यासाठी दुवाच आहे. फिल्मफेअरची काळी बाहुली माझ्यासाठी फक्त पुरस्कार नाही, तर आयुष्यभराचं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे,” असं त्या म्हणाल्या.
हे पण वाचा.. लाडक्या पुतणीने केलं काकीचं औक्षण! Genelia Deshmukh भावुक; म्हणाली, “डोळे पाणावले…”
त्यांनी या यशामागे आपल्या संपूर्ण टीमचे आभार मानले. “माझ्या चेहऱ्यावर मंजू माई रंगवणाऱ्या, माझ्या अंगावर ती नेसवणाऱ्या आणि केसांत ती माळणाऱ्या प्रत्येकाचं हे यश आहे. त्यांच्या शिवाय मंजू माई अपूर्ण राहिली असती,” असं त्या म्हणाल्या.
फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्यानंतर छाया कदम यांचा हा भावनिक प्रवास हजारो मराठी चाहत्यांच्या मनाला भिडला आहे. त्यांच्या या कथनातून एक मराठी कलाकार मोठ्या हिंदी सिनेसृष्टीत किती प्रभावीपणे चमकू शकतो, याचं उत्तम उदाहरण सर्वांसमोर आलं आहे.
हे पण वाचा.. “राम मंदिर दर्शनासाठी अयोध्येत पोहोचल्या अश्विनी भावे; विमानतळावर घडला खास क्षण”









