Hina Khan emotional moment : अभिनेत्री हिना खान सध्या ‘पती पत्नी और पंगा’ या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये स्पर्धक म्हणून झळकत आहे. या शोचं सूत्रसंचालन अभिनेत्री सोनाली बेंद्रे करते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमधील एका भावनिक क्षणाने प्रेक्षकांच्या डोळ्यांतही अश्रू आणले. एका टास्कदरम्यान हिना खान आणि सोनाली बेंद्रे दोघीही स्टेजवर भावूक झाल्या आणि वातावरण क्षणभरासाठी शांत झालं.
या एपिसोडमध्ये स्पर्धक रुबिना दलिक हिला एक विशेष टास्क देण्यात आला होता. प्रेक्षकांमधील एखाद्या महिलेला स्वतःचे केस कापण्यास तयार करायचं, असा या टास्कचा उद्देश होता. रुबिनाने त्या महिलेशी संवाद साधत, तिचं मन जिंकलं आणि शेवटी ती महिला केस दानासाठी पुढे आली. तिने सांगितलं की, ती नेहमीच आपल्या केसांचा उपयोग एखाद्या कर्करोगाने ग्रस्त व्यक्तीसाठी करायचा विचार करत होती. हा भावनिक संवाद ऐकून स्टेजवर उपस्थित सर्व स्पर्धक काही क्षण शांत झाले.
महिलेने रुबिनाला “तुमच्यासाठी थोडे केस कापू शकते” असं सांगितल्यावर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. नंतर तिने आणखी केस दान करण्याची तयारी दर्शवली आणि रुबिनाने तिचे अर्धे केस कापले. ही कृती पाहून सोनाली बेंद्रे आणि हिना खान दोघींच्याही डोळ्यांत अश्रू आले. दोघी एकमेकींना मिठी मारताना भावनांनी भरून गेल्या.
या क्षणानंतर Hina Khan मंचावर भावूक होत म्हणाली, “हे करण्यासाठी तुमचं धाडस खूप मोठं आहे. तुम्हाला कल्पनाही नाही, या कृतीमुळे कोणाच्या तरी आयुष्यात किती आनंद येऊ शकतो. मी रोज विग घालते… हे केस कोणाचे तरी आहेत, ज्यांनी मनापासून दिले आहेत.” तिच्या या वक्तव्याने सर्वच प्रेक्षकांना भावनिक केलं. सोनाली बेंद्रेही त्या महिलेला म्हणाली, “तुमचं सौंदर्य केसांमध्ये नाही, तर तुमच्या मनात आहे.”
हिना खान आणि सोनाली बेंद्रे या दोघींनाही कर्करोगाचा सामना करावा लागला होता. परंतु त्यांनी तो लढा जिंकत पुन्हा नव्या उमेदीने आयुष्य जगण्यास सुरुवात केली. त्यामुळेच हा प्रसंग त्यांच्या मनात अधिक खोलवर रुजला. केस दानासारख्या साध्या कृतीतून त्यांनी पुन्हा एकदा मानवी संवेदना आणि आशेचा संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला.
हे पण वाचा.. Abhishek Kumar देवाच्या आशीर्वादाने पूर्ण झालं स्वप्न; अभिषेक कुमार ने मायानगरीत खरेदी केलं आलिशान घर!
‘पती पत्नी और पंगा’ हा कार्यक्रम शनिवार व रविवार रात्री ९ वाजता ‘कलर्स टीव्ही’वर प्रसारित होतो. येणाऱ्या भागात हा हृदयस्पर्शी क्षण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हिना खानच्या या भावूक क्षणाने सोशल मीडियावरही चर्चेला उधाण आलं आहे.
हे पण वाचा..ललित प्रभाकरसोबत “ओल्या सांजवेळी”वर थिरकली गिरिजा प्रभू, रोमँटिक डान्सने जिंकली चाहत्यांची मनं









