nitish chavan lakhat ek amcha dada post : ‘लागिरं झालं जी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला नितीश चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेने अलीकडेच प्रेक्षकांचा निरोप घेतला असून या मालिकेत सूर्यादादा म्हणून नितीशने आपल्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधले. मालिकेच्या शेवटानंतर त्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या सहकलाकारांना आणि प्रेक्षकांना मनापासून धन्यवाद दिले आहेत.
आपल्या पोस्टमध्ये नितीशने लिहिलंय, “सूर्यकांत शंकरराव जगताप ऊर्फ सूर्यादादा तुमच्या सगळ्यांचा निरोप घेतोय. पण सूर्या मित्रा, तू या नितीशला खूप काही दिलंस — नवी ओळख, नवं कुटुंब, नवी ऊर्जा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोड बहिणी दिल्यास.”
नितीशने पुढे भावनिक शब्दांत म्हटलं, “मला सख्खी बहीण नसल्यामुळे तिचं आयुष्य, तिचं जगणं, जबाबदाऱ्या याविषयी कधी विचारच केला नव्हता. पण सूर्या या भूमिकेमुळे मला बहिणीचं प्रेम मिळालं, नात्याची ओळख झाली आणि भाऊ-बहिणीच्या नात्याचं सौंदर्य अनुभवता आलं.”
या पोस्टमध्ये त्याने मालिकेतील आपल्या सहकलाकारांविषयीही मनापासून भावना व्यक्त केल्या. अनुभवी अभिनेते गिरीश ओक यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगताना तो म्हणतो, “सर, तुम्ही आमच्यासोबत मित्रासारखे राहिलात, म्हणून आम्ही मोकळेपणाने काम करू शकलो.”
मालिकेत त्याच्या बहिणींच्या भूमिका साकारणाऱ्या कोमल मोरे, ईशा संजय, जुई तानपुरे आणि समृद्धी साळवी यांच्याबद्दल तो लिहितो, “पाच बोटं जुळली की मूठ तयार होते आणि ताकद येते. माझ्या गोड बहिणींनो, तुमच्याशिवाय सूर्या पूर्ण झाला नसता. तुम्ही सगळ्या टॅलेंटेड आहात, खूप प्रेम!”
त्याने मालिकेतील इतर कलाकारांचाही विशेष उल्लेख केला आहे. महेश जाधव आणि स्वप्नील कणसे यांना ‘आधारस्तंभ’ म्हणत त्याने त्यांच्याविषयी आपुलकी व्यक्त केली. तर विरोधी पात्र साकारणाऱ्या अतुल कुडाळेला उद्देशून लिहिलं, “तू ऑनस्क्रीन शत्रू असलास तरी ऑफस्क्रीन चांगला मित्र आहेस.”
तसेच धनश्रीच्या नवऱ्याची भूमिका करणाऱ्या शुभम पाटीलविषयी तो लिहितो, “दाजीबा, तुम्ही प्रेमानं खोबऱ्याची बर्फी आणायचा, ती आठवण कायम मनात राहील.”
पोस्टच्या शेवटी नितीश चव्हाणने दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ आणि झी मराठी या सर्वांचे आभार मानले आहेत. या मालिकेमुळे त्याला पुन्हा एकदा झी मराठीच्या कुटुंबाचा भाग होता आले, याबद्दल तो कृतज्ञ आहे.
हे पण वाचा.. ‘ठरलं तर मग’ने Star Pravah Serial TRP Chart मध्ये टॉपवर इतर मालिकांना मागे टाकलं!
‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेद्वारे नितीश चव्हाणने केवळ अभिनय नाही तर भावनांचं जगही जिंकून घेतलं आहे. त्याची ही मनापासूनची पोस्ट चाहत्यांच्या मनात आणखी एकदा ‘सूर्यादादा’ची आठवण जागवून गेली आहे.
हे पण वाचा.. ““‘लाखात एक आमचा दादा’ मालिका संपली; अभिनेत्री कोमल मोरे हिची भावुक निरोपपोस्ट चर्चेत!









