gauri nalawade jodidar apeksha mulakhat : मराठी चित्रपटसृष्टीतील देखणी आणि प्रतिभावान अभिनेत्री गौरी नलावडे नेहमीच तिच्या अभिनयामुळे तसेच प्रामाणिक स्वभावामुळे चर्चेत असते. मालिकांपासून ते चित्रपटांपर्यंत आपल्या प्रभावी अभिनयाने तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अलीकडेच प्रसाद ओक दिग्दर्शित ‘वडापाव’ या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली असून या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या भावी जोडीदाराबाबत काही खास अपेक्षा मांडल्या आहेत.
गौरी नलावडेने नुकतीच ‘लोकशाही फ्रेंडली’ या कार्यक्रमाला दिलेल्या मुलाखतीत स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याविषयी मोकळेपणाने संवाद साधला. ती म्हणाली, “हो, मला लग्न करायचं आहे, पण योग्य व्यक्ती मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे. माझ्या जोडीदाराकडून काही फार मोठ्या अपेक्षा नाहीत. तो फक्त प्रामाणिक आणि कर्तृत्ववान असावा.”
गौरी पुढे म्हणाली की, “माझ्या घरात मी ज्या पुरुषांना पाहिलं आहे, ते स्वतःच्या मेहनतीने आणि कर्तृत्वावर मोठे झालेले आहेत. त्यामुळे मला कायम अशी माणसं आवडतात जी स्वतःच्या प्रयत्नांवर उभ्या राहिल्या आहेत. कर्तृत्व आणि प्रामाणिकपणा हे दोन गुण माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहेत.”
तिने पुढे स्पष्ट केलं, “आपण सगळेच चुका करतो, पण अप्रामाणिकपणा मला अजिबात आवडत नाही. माणूस खरं बोलतो का, हे त्याच्या वागणुकीतून समजतं. प्रामाणिक व्यक्ती कधीच खोटं बोलत नाही आणि त्यामुळं नात्यात गैरसमज होण्याची शक्यता कमी होते. माझ्या आयुष्यात जेव्हा जेव्हा अडचणी आल्या, तेव्हा मी नेहमी खरं बोलून त्या सोडवल्या आहेत.”
अभिनेत्रीने आणखी सांगितले की ती कधीच कुणाला खोटी कारणं देऊन काम नाकारत नाही. तिच्या मते, प्रामाणिक माणूस असेल तर तो खरा साथीदार ठरतो आणि अशाच व्यक्तीसोबत ती तिचं आयुष्य व्यतीत करू इच्छिते.
हे पण वाचा.. “गौतमी पाटीलवर संतापाचा स्फोट! पवन चौरेचा थेट सवाल – ‘तू महाराष्ट्राचा बिहार केलास का?’”
दरम्यान, गौरी नलावडेचा ‘वडापाव’ हा चित्रपट नुकताच २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात प्रसाद ओक, अभिनय बेर्डे, सविता प्रभुणे, रितिका श्रोत्री, शाल्व किंजवडेकर आणि रसिका वेंगुर्लेकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटातून गौरीने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
गौरी नलावडेच्या या स्पष्ट आणि प्रामाणिक वक्तव्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय निर्माण झाला आहे. तिच्या मनासारखा जोडीदार तिला कधी भेटतो, हे पाहणं आता रसिकांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे.
हे पण वाचा.. लहानपणी ‘निशिगंधा वाड’ हिने दिले हिऱ्याचे कानातले भंगारवाल्याला; त्यानंतर जे घडलं ते आयुष्यभर विसरता येणार नाही!









