shantanu moghe priya marathe bhavnik post : मराठी अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनाला आज एक महिना पूर्ण झाला आहे. या काळात तिचा पती व अभिनेता शंतनू मोघे प्रचंड भावनिक अवस्थेत होता. अनेक दिवस तो शांत राहिला होता. मात्र अखेर या दुःखाला शब्द देत त्याने पहिली सोशल मीडिया पोस्ट शेअर केली. या पोस्टमधून त्याने पत्नीबद्दलच्या आठवणी, तिच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव आणि मनातील वेदना मांडल्या.
शंतनू मोघेने प्रियासोबतचे काही फोटो शेअर करत लिहिले, “आज तुझ्याविना एक महिना झाला. वैयक्तिक वेदना शब्दांत व्यक्त करणं अशक्य आहे. इतक्या निरागस, प्रेमळ आणि सकारात्मक आत्म्याचा असा अकाली निरोप मिळणं ही अत्यंत अन्यायकारक गोष्ट आहे. आमच्या आयुष्यात आजही त्या पोकळीची जाणीव होते.”
त्याने पुढे सांगितलं की, प्रियाने तिच्या कामातून, कलाकृतीतून, प्रेमातून आणि संवेदनशील वागणुकीतून असंख्य हृदयांना स्पर्श केला. तिची सकारात्मक ऊर्जा, दयाळूपणा आणि लोकांना जोडून ठेवण्याची वृत्ती कायम लक्षात राहील. “देवांनी पुढे जर तिच्यावर प्रेम आणि काळजी घेण्यात एकही चूक केली, तर ती मी माफ करणार नाही,” असा भावनिक इशाराही शंतनू मोघेने दिला.
या खास पोस्टमध्ये त्याने या काळात त्याच्या सोबत उभ्या राहिलेल्या सर्व नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, चाहते आणि सहकाऱ्यांचे आभार मानले. त्याने नमूद केले की, “फोन, ई-मेल, व्हॉट्सअॅप, एक्स (ट्विटर), फेसबुक, इंस्टाग्राम आणि इतर माध्यमांद्वारे व्यक्त झालेली सहानुभूती व शुभेच्छा माझ्या मनाला स्पर्शून गेल्या. परिचित तसेच अनोळखी लोकांनी दिलेला आधार माझ्यासाठी फार महत्त्वाचा ठरला.”
शंतनूने पुढे लिहिले की, जगभरातून आलेल्या संदेशांमुळे त्याचा माणुसकीवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. “तुमच्या भावना आणि प्रामाणिकपणा आमच्यापर्यंत कोणत्याही अडथळ्याशिवाय पोहोचले. देव तुमचं भलं करो,” असं तो म्हणाला.
हे पण वाचा..“सिनेइंडस्ट्रीला तारलेलं माध्यम म्हणजे टेलिव्हिजनच, तेजश्री प्रधानचा ठाम पवित्रा
प्रियाच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला होता. तिचं अकाली जाणं चाहत्यांना पचवणं कठीण झालं. आता शंतनू मोघेची ही भावनिक पोस्ट वाचून चाहत्यांचे डोळे पुन्हा एकदा पाणावले आहेत.
हे पण वाचा.. “ईशा संजयचा ग्लॅमरस अवतार; नारकर कुटुंबाची होणारी सून सोशल मीडियावर चर्चेत!”









