meera joshi mazivada uddhanpul anubhav : मराठी प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री Meera Joshi (‘तुझं माझं ब्रेकअप’ फेम) नुकतीच एका अनपेक्षित प्रसंगामुळे चर्चेत आली आहे. माजिवडा उड्डाणपुलावर तिच्या गाडीला अचानक बिघाड झाल्याने ती अडचणीत सापडली होती. या प्रसंगात तिला एका अनोळखी दुचाकीस्वाराने व ठाणे पोलिसांनी केलेली मदत पाहून ती भावूक झाली आणि सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर करत “माणुसकी अजूनही जिवंत आहे” असं म्हणाली.
जोशीने आपल्या पोस्टमध्ये सांगितलं की, “गाडी बंद पडल्यावर मी ती बाजूला घेऊन उभी केली, पण गाडी सुरू होत नव्हती. आजूबाजूला अनेक वाहनं जात होती, पण कोणीही मदतीसाठी थांबत नव्हतं. शेवटी हताश होऊन मी एका दुचाकीस्वाराला आवाज दिला. त्याने लगेच मदत केली आणि गाडीत नेमका काय बिघाड आहे हे तपासलं. त्याने पेट्रोल आणून देण्याची ऑफर दिली आणि मला वाटलं की तो परत येणार नाही. पण काही वेळानंतर तो मोठा कॅन घेऊन परत आला. त्याच्या या कृतीने माझा माणुसकीवरील विश्वास पुन्हा दृढ झाला.”
दरम्यान, गाडीमुळे वाहतूक कोंडी झाल्याने काहींनी नाराजी व्यक्त केली. मात्र ठाणे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मीराला सहकार्य केलं. पोलिसांनी मदत करताना तिच्याकडे “ही मशीन आहे, ती बिघडू शकते” असं सांगत समजूतदारपणा दाखवला. त्यांच्या या जलद प्रतिसादामुळे परिस्थिती सहज हाताळली गेली.
हे पण वाचा.. स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकांची जोरदार एंट्री; ‘नशीबवान’ ठरली स्लॉट लीडर, ‘लपंडाव’नेही मारली दमदार झेप
मदत करणाऱ्या अनोळखी दुचाकीस्वाराचे आभार मानताना मीराने सांगितलं की, “मी त्याला पैसे देण्याचा प्रयत्न केला, पण तो काहीही न घेता हसत निघून गेला. त्याचा हा दयाळूपणा आणि पोलिसांचा सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोन खरोखरच प्रशंसनीय आहे.”
या पोस्टनंतर मीरा जोशी चाहत्यांच्या कौतुकाची धनी ठरली आहे. सोशल मीडियावर तिच्या या अनुभवावर भरभरून प्रतिक्रिया उमटत आहेत. चाहत्यांनी तिच्या धैर्याचे तसेच अनोळखी व्यक्तीच्या मदतीचे कौतुक केले आहे.
हे पण वाचा.. ताडपत्रीच्या घरातून स्वप्नपूर्तीपर्यंत : गौरव मोरेला म्हाडाच्या नव्या घराचा ताबा









