tuzyasathi tuzyasanga teja vaidahi marriage episode : ‘सन मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘Tuzyasathi Tuzyasanga’ अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे. पहिल्या नजरेतल्या प्रेमाची सुंदर मांडणी, भावनिक प्रसंग आणि राजकारणाशी जोडलेला कथानकाचा तडका यामुळे मालिकेने सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आकर्षित केलं आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात मालिकेतील तेजा आणि वैदहीचं लग्न रंगताना दिसलं, ज्यामुळे मालिकेच्या कथानकात मोठा ट्विस्ट येणार आहे.
कथानकानुसार तेजाचा बनवलेला प्लॅन फसतो आणि त्यातून वैदहीचं अपहरण होतं. या घटनेमुळे दोघांच्या आयुष्याला वेगळं वळण मिळतं. माईसाहेबांसाठी वैदहीचं नाव हे जणू चीड निर्माण करणारं असलं तरी स्वतःच्या राजकीय आयुष्यावर परिणाम होऊ नये म्हणून त्या तेजाचं लग्न वैदहीसोबत लावून देतात. या लग्नामागे प्रत्येकाच्या स्वार्थाची छाया आहे, मात्र तेजासाठी ही गोष्ट स्वप्नवत ठरते. ज्याच्या प्रेमात तो पहिल्याच भेटीत पडला होता, त्याच्यासोबत आता लग्नबंधनात अडकण्याचा क्षण त्याच्यासाठी अविस्मरणीय ठरतो.
वैदहीसाठी ही परिस्थिती मात्र सोपी नाही. बहिणीच्या भविष्याचा विचार करून तिने होकार दिला असला तरी मक्तेदार घराण्यात प्रवेश केल्यानंतर तिच्या वाट्याला अनेक संघर्ष येणार आहेत. माईसाहेबांकडून होणारा छळ आणि घरातील कटकारस्थानांना ती तोंड देऊ शकेल का, हा प्रश्न प्रेक्षकांना गुंतवून ठेवणार आहे.
या भव्य विवाह सोहळ्याबद्दल अभिनेत्री अनुष्का गीते (वैदही) हिने तिचा अनुभव सांगितला. तिने उघड केलं की, “लग्नाचे दृश्य हे खरं तर सामूहिक विवाहसोहळ्यासारखेच झाले. सेटवर एकाचवेळी ४० ते ५० जोडपी सजूनधजून उपस्थित होती. अगदी दोन दिवसांत आम्ही हा एपिसोड शूट करून पूर्ण केला. नॉनस्टॉप २४ तास शूटिंग झालं तरी सर्व कलाकार आणि पडद्यामागचं टीमवर्क कमाल होतं. कुणीही थकवा दाखवला नाही. उलट आम्ही एकमेकांची काळजी घेत शूटिंग एन्जॉय केलं.”
हे पण वाचा.. “आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका; पारू फेम मुग्धा कर्णिकचा सल्ला”
तिने पुढे सांगितलं की तिचा लग्नातील लूक अत्यंत रॉयल असून प्रेक्षकांना खास आकर्षित करणार आहे. आता लग्नानंतर वैदहीला सामोरं जाणारे संघर्ष आणि तेजासोबतचं नातं कसं आकार घेतं, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
‘Tuzyasathi Tuzyasanga’ ही मालिका आता एका रंजक टप्प्यावर पोहोचली असून तेजा-वैदहीच्या प्रवासात पुढे आणखी अनेक नाट्यमय वळणं येणार आहेत.
हे पण वाचा.. “तू हिरोईन मटेरियल नाहीस म्हणून मालिकेतून बाहेर काढलं”; ऋतुजा बागवेने शेअर केला कडू अनुभव









