Inspector Zende on Netflix : भारतीय गुन्हेगारी जगतात चार्ल्स सोभराज हे नाव ऐकले की अजूनही थरकाप उडतो. त्याला “बिकिनी किलर” किंवा “स्विमसूट किलर” म्हणून ओळखले जात असे. त्याच्या चलाखीने, फसवणुकीने आणि तुरुंगातून पळून जाण्याच्या घटनांनी अनेक पुस्तकं, मालिका आणि चित्रपटांना प्रेरणा दिली आहे. मात्र, नेटफ्लिक्सवर नुकताच प्रदर्शित झालेला “Inspector Zende” हा चित्रपट या कुख्यात गुन्हेगाराऐवजी त्याला दोनदा गजाआड करणाऱ्या एका कर्तबगार पोलिस अधिकाऱ्यावर प्रकाश टाकतो.
या चित्रपटात मुंबई पोलिसांचे आयपीएस अधिकारी मधुकर बापूराव झेंडे यांच्या साहसकथेचा आढावा घेतला आहे. 1971 मध्ये ताज हॉटेलबाहेर सोभराजला पहिल्यांदा अटक करणं असो किंवा 1986 मध्ये गोव्यातून त्याला पुन्हा पकडणं असो, झेंडेंची जिद्द, बुध्दीमत्ता आणि पारंपरिक तपास कौशल्य या सर्वांचा प्रभाव पडद्यावर प्रभावीपणे दिसतो. आधुनिक तंत्रज्ञान नसतानाही त्यांनी केवळ निरीक्षण, माहितीदार आणि धाडस यांच्या जोरावर अशा गुन्हेगाराला पकडलं, हे आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरतं.
लेखक-दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर यांनी या सत्यकथेला केवळ काळोख्या थ्रिलरच्या चौकटीत न मांडता त्याला विनोदी आणि हलक्या-फुलक्या अंदाजात साकारलं आहे. त्यामुळे चित्रपट जरी गुन्हेगारी जगतावर आधारित असला तरी तो फॅमिली ऑडियन्ससाठीही सहज पाहण्याजोगा वाटतो. मुंबईच्या 70-80 च्या दशकातील रस्ते, पोशाख, वातावरण यांची मांडणी अप्रतिम असून जुन्या शहराचा अनुभव जिवंत होतो.
या चित्रपटाची खरी ताकद मात्र अभिनयात दडलेली आहे. मनोज वाजपेयी यांनी साकारलेला “Inspector Zende” हा व्यक्तिरेखा प्रामाणिक, जमिनीवर पाय असलेला आणि तितकाच विनोदी टच असलेला दिसतो. त्यांची शैली “The Family Man” मधील श्रीकांत तिवारीची आठवण करून देते, पण झेंडे हा पात्र अधिक वास्तववादी आणि सखोल वाटतो. दुसरीकडे, जिम सर्भने निभावलेला कार्ल भोजराज (सोभराजचा काल्पनिक अवतार) देखील तितकाच रंगतदार आहे – मोहक, आत्मविश्वासू आणि धोकादायक.
हे पण वाचा.. प्रिया मराठेच्या आठवणीत मृणाल दुसानीस भावुक; म्हणाली – Mrunal Dusanis on Priya Marathe
सचिन खेडेकर यांनी पोलिस महासंचालकाची ताकदवान भूमिका केली असून, गिरिजा ओक यांनी झेंडेंच्या पत्नीच्या व्यक्तिरेखेला उबदारपणा दिला आहे. बाळचंद्र कदम आणि वैभव मंगले यांसारख्या कलाकारांनी हलक्या फुलक्या क्षणांची भर घातली आहे.
चित्रपटाचा शेवट गोवा आणि मुंबई पोलिसांमधील कैद्याच्या ताब्यासाठीची झुंज दाखवतो, ज्यात थोडा विनोद आणि थोडा सस्पेन्स यांचा मेळ साधला आहे.
शेवटी, “Inspector Zende” हा ना पूर्णपणे चरित्रपट आहे ना पूर्णपणे काल्पनिक थ्रिलर. तो दोन्हींच्या मधोमध उभा आहे – एका विस्मृतीत गेलेल्या पोलिस नायकाला आदरांजली वाहत, त्याच वेळी प्रेक्षकांना हलक्या-फुलक्या पद्धतीने गुंतवून ठेवणारा. मनोज वाजपेयींच्या अभिनयासाठी आणि जुन्या मुंबईच्या प्रामाणिक चित्रणासाठी हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा ठरतो.
हे पण वाचा.. “Baaghi 4”: टायगर श्रॉफच्या दमदार अॅक्शनला प्रेक्षकांची दाद, पण कथानकावर मिश्र प्रतिक्रिया









