Prajakta Gaikwad Maratha Andolan : मराठा आरक्षणासाठी मागील अनेक महिन्यांपासून लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अखेर मोठं यश मिळालं आहे. मुंबईत आझाद मैदानावर पाच दिवस उपोषण करत सरकारकडून मागण्या मान्य करून घेण्यात मराठा समाजाला यश आल. यानंतर महाराष्ट्रभर मराठा बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. या ऐतिहासिक क्षणी अनेकांनी आंदोलनाचं स्वागत करत आपली भावना व्यक्त केली. त्यात लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने केलेली एक खास पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
प्राजक्ता गायकवाडने आपल्या इंस्टाग्रामवर लिहिलंय, “जेव्हा जेव्हा मराठा लढतो, तेव्हा तेव्हा इतिहास घडतोच.” तिच्या या पोस्टने मराठा समाजाच्या संघर्षाचं आणि विजयाचं सार एका वाक्यात मांडल्याचं दिसून येते आहे. त्याचसोबत प्राजक्ताने आरक्षण मिळवून देण्यासाठी झटलेल्या सर्व मराठा बांधवांचं मनापासून अभिनंदनही केलं.
सरकारने काढलेल्या जीआरनंतर मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मोठा निकाल लागला असून, या लढ्याचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांसमोर आपल्या भावना व्यक्त करताना “जिंकलो रे राजेहो! आज गरिबाची ताकद किती मोठी आहे हे दाखवून दिलं” असे शब्द उच्चारले. त्यांच्या या भावना ऐकून उपस्थित हजारो मराठा बांधवांनी एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करत विजयी जल्लोष साजरा केला.
दरम्यान, उपोषणाच्या काळात मनोज जरांगे यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र आंदोलन यशस्वी झाल्याने त्यांच्या या लढ्याला मिळालेलं यश ऐतिहासिक ठरलं आहे.
हे पण वाचा.. मनाला भिडणारा टीझर! सुबोध भावे आणि मानसी नाईकच्या ‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाची जोरदार चर्चा
प्राजक्ता गायकवाड हिच्या या पोस्टवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तिच्या विचारांना पाठिंबा दर्शवत “तुझं हे शब्द आमच्या मनाला भिडले” असं लिहिलंय. सोशल मीडियावर प्राजक्ता गायकवाड ची पोस्ट सध्या चर्चेत असून, तिच्या या भावनिक पोस्टमुळे समाजातील तरुणांमध्ये प्रेरणेची नवी लाट दिसून येत आहे.
मराठा समाजाच्या दीर्घकाळ चाललेल्या संघर्षाला मिळालेलं हे यश केवळ आरक्षणापुरतं मर्यादित नसून, एकतेच्या शक्तीचं दर्शन घडवणारं आहे. आणि त्याच क्षणाला अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने शब्दबद्ध करून चाहत्यांपर्यंत पोहोचवलं आहे.









