Soham Bandekar and Pooja Birari marriage rumors : गणेशोत्सवाच्या उत्साहात बांदेकर कुटुंबाची बाप्पाच्या आरतीची झलक दरवर्षीप्रमाणे यंदाही सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर करण्यात आली. आदेश व सुचित्रा बांदेकर यांच्या घरातील हा खास क्षण पाहण्यासाठी नेटकरी नेहमीच आतुर असतात. मात्र यंदा या आरतीत एक वेगळंच आकर्षण ठरलं ते म्हणजे अभिनेत्री पूजा बिरारीची उपस्थिती. तिचा व्हिडीओ समोर येताच चाहत्यांच्या कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला आहे.
बांदेकर दांपत्याचा मुलगा सोहम बांदेकर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ‘ठरलं तर मग’ आणि ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकांचा निर्माता म्हणून तो सध्या जबाबदारी सांभाळतोय. यापूर्वी ‘नवे लक्ष्य’ मालिकेत अभिनय केलेला सोहम चित्रपटसृष्टीतही झळकला आहे. काही दिवसांपूर्वीपासूनच सोशल मीडियावर अभिनेत्री पूजा बिरारीच त्याची जीवनसाथी होणार अशी चर्चा रंगली होती. मात्र, याबाबत दोघांनीही मौन बाळगलं होतं.
दरम्यान, सुचित्रा बांदेकर यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सोहमच्या लग्नाविषयी संकेत दिल्याने या चर्चांना अधिक रंग मिळाला होता. अशा पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सवात बांदेकरांच्या बाप्पाच्या आरतीला पूजा बिरारीची उपस्थिती दिसून आली आणि या चर्चा आणखी तापल्या. आरतीच्या व्हिडीओमध्ये ती सुचित्रा बांदेकरांच्या शेजारी उभी असल्याचे पाहून अनेक नेटकऱ्यांनी “भावी सूनबाईंचं दर्शन झालं” अशा प्रतिक्रिया दिल्या. काहींनी तर “सासू-सून एकत्र बाप्पाचं दर्शन घेतायत” अशी मजेशीर कमेंटही केली.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर चाहते म्हणत आहेत, “गणपतीसोबत यंदा भावी सुनबाईंचंही दर्शन झालं”. त्यामुळे सोहम-पूजा लग्नाच्या चर्चांना परत एकदा उधाण आलं आहे.
हे पण वाचा.. नवरी मिळे हिटलरला’ फेम आलापिनी निशाळसोबत छेडछाड; सोशल मीडियावर शेअर केली घटना
पूजा बिरारी सध्या ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत मंजिरीची भूमिका साकारते आहे. याआधी ती ‘स्वाभिमान – शोध अस्तित्वाचा’ या मालिकेत झळकली होती. दुसरीकडे सोहमने ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिकाही साकारली आहे. निर्माता म्हणून मिळवलेलं यश आणि अभिनयाची छाप यामुळे तो स्वतःला वेगळ्या उंचीवर पोहोचवत आहे.
बांदेकर कुटुंबातील हा खास सण आणि त्यात पूजाची उपस्थिती यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. खरंच सोहम-पूजाचं लग्न लवकरच होणार का? याचे उत्तर येत्या काळात मिळेल, पण सध्या तरी गणेशोत्सवाच्या निमित्ताने या जोडीबद्दलच्या चर्चा चाहत्यांच्या मनात रंगल्या आहेत.
हे पण वाचा.. Star Pravah serial update : अवघ्या ९ महिन्यांत संपणार लोकप्रिय मालिका, १५ सप्टेंबरपासून वाहिनीवर मोठा बदल









