मराठी मनोरंजनसृष्टीवर आज शोककळा पसरली आहे. लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे (Priya Marathe) हिचे वयाच्या केवळ ३८व्या वर्षी निधन झाले. गेल्या अडीच वर्षांपासून ती कर्करोगाशी झुंज देत होती. मात्र आज, ३१ ऑगस्ट २०२५ च्या पहाटे मिरा रोड येथील राहत्या घरी तिने अखेरचा श्वास घेतला. तिच्या जाण्याने संपूर्ण मराठी तसेच हिंदी कलाविश्व शोकमग्न झालं आहे.
अनेक कलाकारांनी तिच्या जाण्यावर दु:ख व्यक्त केले असले तरी दिग्दर्शक Viju Mane यांची पोस्ट विशेष भावुक करणारी आहे. प्रियाशी असलेल्या आत्मीय नात्याची आठवण त्यांनी शब्दबद्ध केली आहे. प्रिया त्यांना वडिलांसारखी जिव्हाळ्याची वाटायची, हे त्यांनी उघडपणे सांगितलं. फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये Viju Mane लिहितात – “A fairytale ends… ‘मला वडील नाहीत, माझे वडील बनाल का?’ हा प्रश्न अजूनही कानात घुमतोय. सssssर अशी मोठ्यानं हाक मारून ती अक्षरशः लहानग्या मुलीसारखी बिलगायची. माझ्या बायकोपेक्षा वयाने मोठी असूनही मी तिला मनापासून ‘लेक’ मानलं होतं.”
त्यांनी पुढे तिच्या रंगभूमीवरील पहिल्या पावलांची आठवण काढली. “बांदोडकर कॉलेजात ‘अ फेअरी टेल’ या नाटकात राजकन्या बनून ती रंगमंचावर आली होती. तिला एकांकिकेत आणताना जणू बोटाला धरून आणलं होतं आणि तसंच ती माझ्या आयुष्यातही वावरली. माझ्या मुलीला मी नेहमी सांगायचो की तुझ्याआधी मला अजून एक मुलगी आहे. तिच्या आयुष्यातले चढउतार जवळून पाहिले, पण तिला शंतनु सारखा गोड मुलगा मिळाल्याचं पाहून खूप समाधान वाटलं. पण गोष्ट अशी संपायला नको होती प्रिया… बाबा मिस यू, बाबा लव्ह यू.”
ही पोस्ट वाचताना चाहत्यांच्या डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहत नाही. Viju Mane नी प्रियाला केवळ अभिनेत्री म्हणून नव्हे तर मुलगी म्हणून स्वीकारलं होतं, हे शब्दातून प्रकर्षाने जाणवतं.
हे पण वाचा.. Priya Marathe चं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन; सोशल मीडियावरील शेवटची पोस्ट चर्चेत
Viju Mane हे मराठीतील गाजलेले दिग्दर्शक आहेत. ‘शिकारी’, ‘शर्यत’, ‘बायोस्कोप’, ‘खेळ मांडला’, ‘पांडू’ यांसारखे चित्रपट त्यांनी प्रेक्षकांना दिले. तसेच ‘स्ट्रगलर साला’ या युट्यूब सीरिजमुळेही ते विशेष चर्चेत राहिले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेकांना संधी दिली, तर काही कलाकारांशी नातं आयुष्यभरासाठी घट्ट झालं. प्रिया मराठे यांचं नातं त्यापैकीच एक.
प्रियाच्या अचानक जाण्याने मनोरंजनसृष्टीतील एक प्रतिभावान अभिनेत्री कायमची हरपली आहे. पण तिच्या आठवणी आणि कलाकृती कायमच चाहत्यांच्या मनात जिवंत राहतील. Viju Mane यांच्या हृदयस्पर्शी शब्दांनी या दुःखद क्षणाला अजून अधिक वेदना दिल्या आहेत.
हे पण वाचा.. Priya Marathe चं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन; सोशल मीडियावरील शेवटची पोस्ट चर्चेत









