मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) सध्या तिच्या प्रकृतीमुळे चर्चेत आहे. ‘पवित्र रिश्ता’ या हिंदी मालिकेतून घराघरात पोहोचलेली आणि नंतर मराठी चित्रपट व मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी Prarthana Behere, सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. काही दिवसांपूर्वीच तिने चाहत्यांना आपल्या डाव्या गुडघ्याच्या शस्त्रक्रियेबद्दल माहिती दिली होती. आता या शस्त्रक्रियेविषयी तिने पहिल्यांदाच सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
राजश्री मराठीशी बोलताना Prarthana Behere ने स्पष्ट सांगितलं की, “माझा पाय मुरगळला आणि त्यामुळे गुडघा सुजला होता. डॉक्टरांनी दिलेल्या औषधोपचारांचा मी नियमित वापर करत होते. पण त्यानंतर शूटिंगसाठी थायलंडला गेले असता पाय आणखी सुजला. त्यावेळी गोळ्या-औषधे घेत शूटिंग करत राहिले, मात्र ते चुकीचं ठरलं. लहानशा दुखण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे लिगामेंटवर गंभीर परिणाम झाला आणि शेवटी शस्त्रक्रियेव्यतिरिक्त दुसरा पर्यायच उरला नाही.”
Prarthana Behere च्या मते, आयुष्यातील ही पहिलीच शस्त्रक्रिया होती आणि त्यामुळे तिला प्रकृतीकडे लक्ष देण्याचं महत्त्व उमगलं. प्रार्थना पुढे म्हणाली, “मी माझ्या शरीराकडे पुरेसं लक्ष दिलं नाही. नवराही म्हणाला की, एवढं होईपर्यंत कसं काही कळलं नाही? शस्त्रक्रियेनंतर सतत वेदना जाणवत होत्या, औषधं घ्यावी लागत होती. पण आता ठरवलंय की जास्त गोळ्या-औषधे घ्यायच्या नाहीत.”
हे पण वाचा.. “हे जग तिरस्कारानं भरलेलं…” Shreyas Raje चा गणेशोत्सवातील अनुभव; सोशल मीडियावर शेअर केलेले भावनिक शब्द
गणेशोत्सवाच्या काळात तिच्या आयुष्यात एक वेगळं उर्जेचं वातावरण निर्माण झाल्याचं ती सांगते. “बाप्पा आल्यावर मला आतून एक नवी ताकद मिळतेय असं जाणवतंय. वेदना असूनही आता मी कामं करत आहे. ही उर्जा नक्की कुठून येते हे माहीत नाही, पण बाप्पामुळेच असं होतं असं मला वाटतं. त्यामुळे सगळ्यांनी आपल्या प्रकृतीकडे गांभीर्याने पाहावं, दुर्लक्ष करू नये,” असा संदेश Prarthana Behere ने चाहत्यांना दिला.
Prarthana Behere चे हे स्पष्ट वक्तव्य तिच्या चाहत्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. तिच्या या प्रवासातून स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं किती गरजेचं आहे, याची जाणीव सर्वांना झाली आहे.
हे पण वाचा.. सासुबाईंनी केलं Mrunal Dusanis चं कौतुक; म्हणाल्या – “ती जशी स्क्रीनवर आहे तशीच खऱ्या आयुष्यातही”









