गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू होण्याची चाहूल लागली की प्रत्येक घरात वेगळीच उत्सुकता अनुभवायला मिळते. रस्त्यापासून घरापर्यंत, सार्वजनिक मंडळांपासून ते छोट्या गल्ल्यांपर्यंत सर्वत्र “गणपती बाप्पा मोरया” चा घोष ऐकू येतो. याच तयारीच्या वातावरणात मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) हिने आपल्या गणेशोत्सवाबद्दल काही खास आठवणी आणि अनुभव चाहत्यांशी शेअर केले आहेत.
झी मराठीवरील “वीण दोघातली ही तुटेना” या मालिकेत ‘स्वानंदी‘ची भूमिका साकारत Tejashree Pradhan सध्या घराघरात पोहोचली आहे. अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर करणारी ही अभिनेत्री जितकी पडद्यावर आपुलकीची वाटते, तितकीच खऱ्या आयुष्यात साधी, कुटुंबाशी जोडलेली आणि पारंपरिक संस्कार जपणारी आहे.
Tejashree Pradhan ने यंदा गणेशोत्सव कसा साजरा करणार याची माहिती देताना सांगितले की, “आमच्या घरचा गणपती फिरता असतो. या वर्षी गणपती माझ्या सख्या काकाच्या घरी म्हणजेच गोरेगावला आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंब तेथे एकत्र जमून बाप्पाची स्थापना आणि पूजन करणार आहे.”
तिच्या आठवणीत बालपणापासूनच गणेशोत्सवाचं वेगळं स्थान आहे. “माझा जन्म झाल्यापासून आजवर गणपती स्थापना नेहमीच प्रधानांच्या घरी होत आलेली आहे. त्या परंपरेची सातत्याने जपणूक होत असल्याचं पाहून मला खूप आनंद वाटतो,” असं ती भावूक होत म्हणाली.
गणेशोत्सव म्हटलं की खाद्यपदार्थांची रेलचेल हा त्याचा अविभाज्य भाग. परंतु त्यातही मोदकाचा मान वेगळाच. तेजश्री हसत म्हणते, “मोदक खाणं टाळणं माझ्यासाठी जवळपास अशक्य आहे. डायट असो वा फिटनेसचा विचार असो, पण गणपतीत मोदक खाण्याला मी कधीच नकार देऊ शकत नाही. मोदक आणि माझी वीण खूप घट्ट आहे. उपाशी राहीन पण मोदक नक्की खाईन.”
तिच्या या कबुलीजबाबातून मोदकाविषयी असलेलं तिचं प्रेम चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटवतं.
Tejashree Pradhan ने आपल्या बालपणातील काही आठवणीही सांगितल्या. “गणेशोत्सवात सोसायटीत आयोजित कार्यक्रमांमध्ये मी नेहमीच भाग घेत असे. गाणी, नाटकं, नृत्य अशा विविध कलांच्या माध्यमातून मी बाप्पासमोर सादरीकरण करायचे. कदाचित त्या दिवसांपासूनच कलाक्षेत्राकडे माझं पाऊल वळलं आणि आज मी इथवर पोहोचले आहे. असं वाटतं की बाप्पाच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य झालं नसतं.”
अभिनय, लेखन, कविता आणि साहित्याची गोडी असलेल्या तेजश्रीला गणरायाबद्दल विशेष आदर आहे. तिला वाटतं की तिच्या कलाविश्वातील प्रवासात बाप्पाचा हात कायम राहिला आहे. “माझ्या सादरीकरणातील प्रत्येक क्षणात बाप्पाची कृपा आहे असं मला आजही वाटतं,” ती नम्रपणे म्हणते.
हे पण वाचा.. ‘शिवा’ फेम अभिनेत्री Manasi Suresh हिने स्वतःच्या हातांनी साकारला घरचा बाप्पा; मातीपासून बनवली सुंदर मूर्ती
तेजश्री प्रधान ही केवळ अभिनेत्रीच नाही तर एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने तिने आपल्या चाहत्यांना एक संदेश दिला – “गणरायाचा उत्सव हा आनंद आणि एकत्र येण्याचा काळ आहे. बाप्पाची आराधना करताना समाजात सकारात्मकता आणि ऐक्य जपणं ही खरी गरज आहे.”
गणेशोत्सव हा प्रत्येकासाठी आनंद, श्रद्धा आणि उत्साहाचा पर्व असतो. मात्र Tejashree Pradhan साठी हा उत्सव म्हणजे बालपणाच्या गोड आठवणी, कुटुंबीयांसोबतचा बंध, आणि मोदकावरील अतूट प्रेम. गोरेगावच्या घरात बसणारा बाप्पा, तिच्या कुटुंबाला आणि चाहत्यांना एकत्र बांधणारा दुवा ठरणार आहे. अभिनयाच्या धकाधकीतून वेळ काढून ती जेव्हा या उत्सवात रमते, तेव्हा तिच्या मनातल्या साधेपणाचा आणि अध्यात्मिक जिव्हाळ्याचा प्रत्यय येतो.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने तेजश्री प्रधानचे हे अनुभव आणि भावना तिच्या चाहत्यांसाठी प्रेरणादायी ठरतील, यात शंका नाही.
हे पण वाचा.. सतत डोळ्यांत पाणी येतंय…”: Ajinkya Raut चा आजीसाठी भावनिक पोस्ट, ‘अभंग तुकाराम’सोबत खास आठवणींचा क्षण









