गणेशोत्सवाचे दिवस आणि त्यात सोशल मीडियावरून येणारे वेगवेगळे संदेश, हे चित्र महाराष्ट्रात नेहमीच पाहायला मिळते. यंदा एका रील व्हिडिओमुळे वाद पेटला आणि त्याचा केंद्रबिंदू ठरला लोकप्रिय इन्फ्लुएन्सर Atharva Sudame. गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर अथर्वने एक रील शेअर केली होती, ज्यात हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश देण्यात आला होता. परंतु हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर काहींनी त्याच्यावर जोरदार टीका केली. वाढत्या वादामुळे अथर्वने तो व्हिडिओ डिलीट करत माफी मागितली.
या प्रकरणानंतर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, तसेच कलाविश्वातील कलाकारांनीही आपले मत व्यक्त करायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट शेअर करून Atharva Sudame चा पाठीशी उभे राहण्याचा संदेश दिला होता. आणि आता याच पंक्तीत अभिनेते अभिजीत केळकरही सहभागी झाले आहेत.
अभिजीत केळकरने आपल्या फेसबुक पोस्टमधून अथर्वला पाठिंबा देताना स्पष्टपणे सांगितले की, धर्म आणि जात या गोष्टी माणसाला वेगळं करण्यासाठी नव्हेत. “मी ब्राह्मण जातीमध्ये जन्माला आलो, पण त्यात माझं काही कर्तृत्व नाही. सरकारी कागदपत्रांसाठी जात लिहावी लागते, म्हणून लिहितो. पण माझ्या आईवडिलांनी कधीही जातपात मानण्याचे संस्कार दिले नाहीत,” असे केळकर म्हणाला.
तो पुढे म्हणाला, “आपण ज्या गणपती बाप्पाला बुद्धीची देवता मानतो, त्याची मूर्ती कोण घडवतो, तो कोणत्या धर्माचा आहे, याचा मला फरक पडू नये. कारण माझा हिंदू धर्म मला ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही शिकवण देतो. मला रक्त दिलं, शेतात धान्य पिकवलं, उपचार केलेल्या डॉक्टराने कोणत्या धर्माचा असावं याचा विचार मी कधी करत नाही. मग मूर्तीकाराचा धर्म का महत्त्वाचा ठरावा?”
अभिजीतने आपल्या पोस्टमध्ये देशातील अनेक मुस्लिम व्यक्तींच्या योगदानाचा उल्लेख केला. ए. पी. जे. अब्दुल कलाम, उस्ताद बिस्मिल्लाह खान, तबला नवाज अल्लारखा खान, झाकीर हुसेन, ए. आर. रेहमान, सानिया मिर्झा, तसेच बॉलिवूडमधील मधुबाला, नर्गिस, मीना कुमारी यांचं नाव घेत तो म्हणाला, “आपल्याला जर या सर्वांविषयी आदर आहे, त्यांच्यावर प्रेम आहे, तर त्यांचा धर्म कधी विचारात घेतला का? मग Atharva Sudame ने जो संदेश आपल्या व्हिडिओतून दिला, तो काहींना का खटकतो?”
वादग्रस्त ठरलेला अथर्वचा व्हिडिओ असा होता—गणेशोत्सवासाठी मूर्ती घेण्यासाठी गेलेल्या अथर्वला मूर्तीकाराचा मुलगा “अब्बू” म्हणून हाक मारतो. त्यानंतर मूर्तीकार अथर्वला मूर्ती पाहण्यास सांगतो. पण अथर्व स्पष्टपणे म्हणतो की, “मला मूर्ती तुमच्याकडूनच घ्यायची आहे.” यावेळी तो सांगतो की, त्याचे वडील नेहमी म्हणतात, “आपण साखर व्हावं, जी खीरही गोड करते आणि शीरखुर्माही. आपण वीट व्हावं, जी मंदिरातही लागते आणि मशिदीतही.” हा संदेश मांडल्यानंतर काहींनी अथर्ववर हिंदुत्वाचा अपमान केल्याचा आरोप केला.
वाद चिघळल्यानंतर अखेर अथर्वने तो व्हिडिओ काढून टाकला आणि सर्वांना माफी मागितली. परंतु त्याच्या या धाडसाला काही जणांनी पाठिंबा दिला आहे. “धर्म माणसाला जोडण्यासाठी आहे, तोडण्यासाठी नाही. अथर्वने दिलेला संदेश योग्य दिशेने आहे,” असे अनेक नेटिझन्स सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत.
या संपूर्ण घडामोडीत महत्त्वाची बाब म्हणजे, समाजात अजूनही धार्मिक एकतेचा संदेश देणारे कलाकार, इन्फ्लुएन्सर आणि राजकीय नेते पुढे येत आहेत. जरी टीका करणाऱ्यांची संख्या मोठी असली, तरी पाठीशी उभे राहणाऱ्यांचीही कमतरता नाही.
हे पण वाचा.. “आपली पुन्हा भेट केव्हा…”; ऐश्वर्या नारकर यांच्या मुलाचा वाढदिवस, गर्लफ्रेंड Isha Sanjay ची खास पोस्ट चर्चेत
Atharva Sudame हा सोशल मीडियावरील एक लोकप्रिय चेहरा आहे. त्याच्या रील्स लाखो लोक पाहतात. त्यामुळे त्याने दिलेला संदेश झपाट्याने व्हायरल होतो. पण याच व्हायरलपणाचे दुसरे रूप म्हणजे टीका आणि वाद, हे आता प्रकर्षाने जाणवत आहे. तरीही अभिजीत केळकरसारख्या कलाकारांनी त्याला सार्वजनिकरित्या पाठिंबा देणं, ही नक्कीच सकारात्मक बाब आहे.
गणेशोत्सव हा आनंद, एकता आणि श्रद्धेचा सण मानला जातो. त्यात जर Atharva Sudame सारखा इन्फ्लुएन्सर एकतेचा संदेश देत असेल, तर त्याचे स्वागत व्हायला हवे. कारण गणपती बाप्पा सर्वांच्याच आहेत—जात, धर्म, पंथ न पाहता. समाजात जर हा दृष्टिकोन रुजला, तर वादाला आपोआपच आळा बसेल.
हे पण वाचा.. ‘ठरलं तर मग’चे ९०० भाग पूर्ण; Jui Gadkari हिची भावनिक पोस्ट, म्हणाली – पूर्णा आजीचं आशीर्वाद कायमसोबत आहे”









