ADVERTISEMENT

Bigg Boss 19 : मराठी कॉमेडियन प्रणित मोरेची घरात एन्ट्री, चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला

Bigg Boss 19 चा भव्य प्रिमियर सोहळा नुकताच पार पडला असून या पर्वात मराठी प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरला आहे कॉमेडियन प्रणित मोरे. त्याच्या एन्ट्रीमुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
Bigg Boss 19

‘बिग बॉस’ हा शो दरवर्षी प्रेक्षकांसाठी नवनवीन वळणं आणि वेगवेगळ्या स्पर्धकांसह रोमांचक ठरत असतो. सलमान खानच्या दमदार होस्टिंगमुळे या रिअॅलिटी शोला मिळणारा ग्लॅमर नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. Bigg Boss 19 चं नवं पर्व २४ ऑगस्टपासून सुरू झालं असून यावर्षीच्या सीझनची थीम ‘राजनीती‘ अशी ठेवण्यात आली आहे. या हंगामात घरातील नियमांपासून ते टास्कपर्यंत अनेक बदल करण्यात आले असून, त्यामुळेच प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

नेहमीप्रमाणे या वेळीही प्रेक्षकांच्या मनात एक प्रश्न होता की, हिंदी ‘बिग बॉस’च्या घरात यंदा कोणते मराठी चेहरे दिसणार? या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळालं आणि या सीझनमध्ये मराठी कॉमेडियन प्रणित मोरेने एन्ट्री घेतली. प्रेक्षक त्याला आधीपासूनच सोशल मीडियावर ‘महाराष्ट्रीयन भाऊ’ म्हणून ओळखतात.

ग्रँड प्रिमियरच्या मंचावर प्रणितने हजेरी लावताच प्रेक्षकांनी त्याचं जोरदार स्वागत केलं. मंचावर सलमान खानशी गप्पा मारताना त्याने पहिल्याच क्षणी सांगितलं की, “माझे वडील तुमचे प्रचंड चाहते आहेत.” हे ऐकून सलमानलाही आनंद झाला आणि त्याने विशेष मराठी भाषेत प्रणितला अभिवादन करत वातावरण आणखी रंगतदार केलं.

कॉमेडीच्या मंचावर आपलं नाव कमावलेला प्रणित सुरुवातीला रेडिओ जॉकी म्हणून कार्यरत होता. नंतर त्याने हळूहळू स्टँडअप कॉमेडीच्या क्षेत्राकडे वळत स्वतःचा स्वतंत्र चाहतावर्ग तयार केला.

प्रणित मोरेच्या विनोदी स्टाईलमुळे त्याला युवकांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे लाखो फॉलोअर्स असून युट्यूबवरही त्याचे व्हिडीओंना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतो. बॉलीवूड सेलिब्रिटींपासून ते दैनंदिन घडामोडीपर्यंत, विविध विषयांवर तो सहज विनोद करतो आणि हेच त्याचं खास वैशिष्ट्य आहे.

मध्यंतरी प्रणित एका वादग्रस्त घटनेमुळे चर्चेत आला होता. त्याने एका कार्यक्रमादरम्यान वीर पहारियाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे काही लोकांनी त्याच्यावर हल्ला केला होता. या घटनेमुळे तो जखमीही झाला. नंतर प्रणितने सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट शेअर करत आपली बाजू मांडली होती. त्यानंतर वीर पहारियाने स्वतः पोस्ट करून प्रणितची माफी मागितली आणि या घटनेशी आपला काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं.

हे पण वाचा.. “लक्ष्मीकांत बेर्डेबरोबर पहिलं काम मिळालं आणि अचानक झालेलं लग्न; Kedar Shinde नी सांगितली जुनी आठवण, पत्नी बेला शिंदे भावुक”

आता प्रश्न असा आहे की, Bigg Boss 19 च्या घरात प्रणित किती काळ टिकणार आणि आपला खेळ कसा मांडणार? स्टँडअप कॉमेडीच्या जोरावर लोकांना हसवणारा प्रणित घरातील राजकारणात किती रंगत आणेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी तो आपली खास शैली वापरेल यात शंका नाही. मात्र या शोमध्ये केवळ विनोद नव्हे, तर स्ट्रॅटेजी, धैर्य आणि समजूतदारपणाचीही मोठी कसोटी असते.

प्रणित मोरेचं घरातलं वावर प्रेक्षकांचं मन जिंकण्यात यशस्वी होईल की नाही, हे पुढील काही आठवड्यांत स्पष्ट होईल. मात्र त्याच्या एन्ट्रीमुळे मराठी प्रेक्षकांना एक वेगळा आनंद मिळाल्याचं निश्चित आहे.

हे पण वाचा.. पूर्णा आजींच्या आठवणीत भावुक कलाकार; ”Tharala Tar Mag’ मालिकेत रिप्लेसमेंटबाबत दिग्दर्शक आणि अमित भानुशालींची भूमिका स्पष्ट