मराठी मनोरंजन विश्वात आपल्या विनोदी टायमिंगमुळे प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान मिळवणाऱ्या Gaurav More याने अलीकडेच ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर एक भावनिक क्षण अनुभवला. आयुष्यभरातील संघर्ष, अपमान आणि त्यातून उभा राहण्याची जिद्द याविषयी त्याने मोकळेपणाने बोलताच उपस्थित सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी आले.
‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ म्हणून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा Gaurav More आजचा लोकप्रिय स्टार असला, तरी त्याचा प्रवास अत्यंत खडतर होता. लहानपणी एका छोट्या घरात राहून संघर्षमय परिस्थितीचा सामना करणारा हा तरुण आज आपल्या मेहनतीच्या जोरावर लाखोंच्या हृदयावर अधिराज्य गाजवत आहे.
‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर गौरव मोरे याच्यासाठी खास स्किट सादर करण्यात आलं. या स्किटमधून त्याच्या आयुष्यातील चढ-उतार दाखवले गेले. स्किट सादर करताना स्पर्धकांनी स्पष्ट सांगितलं – “Gaurav More व्हायचं असेल तर अपमान सहन करण्याची ताकद असावी लागते. तो साध्या दहा बाय दहाच्या खोलीत राहणारा मुलगा होता, पण आज मेहनतीमुळे स्टार झाला आहे. खोटं कौतुक नव्हे, तर खरे अपमान पचवून पुढे जाणं हाच त्याचा खरा मोठेपणा आहे.”
हे ऐकताच वातावरण भारावलं आणि प्रेक्षकांसह उपस्थित कलाकारांच्या भावनांना ऊत आला.
या प्रसंगी ‘चला हवा येऊ द्या’चा होस्ट अभिजीत खांडकेकरने Gaurav More चे कौतुक करत त्याला मिठी मारली. त्याचवेळी श्रेया बुगडे हिच्याही डोळ्यांत पाणी आले. अभिजीत म्हणाला, “आपल्याला थोडं काही बोललं तरी मनाला लागतं. आपला इगो मोठा असतो. पण हे सगळं बाजूला ठेवून केवळ लोकांचं मनोरंजन करणं, हे फक्त तूच करू शकतोस गौरव… तुला मनापासून हॅट्स ऑफ आहे.”
अभिजीतच्या या शब्दांनी संपूर्ण वातावरण आणखी भावनिक झालं.
सगळ्यांच्या भावना ओसंडून वाहत असताना Gaurav More स्वतःही भावुक झाला. त्याने हसत-हसत पण प्रामाणिकपणे सांगितलं, “हो, मी अपमान पचवतो… कारण मी मनात कायम एक गोष्ट ठरवलेली आहे – आपला जन्म एकदाच होतो. आज कोणी मस्करी केली, टोमणे मारले, तर त्याला हसतखेळत घेऊ. समोरच्याला मित्र बनवू. रुसवे-फुगवे मनात ठेवून जगण्यात काही अर्थ नाही. कधी वाईट वाटतं, पण मी स्वतःला समजावतो – उद्या नवीन दिवस आहे, काल काय झालं ते विसरून पुढे जायचं.”
गौरवच्या या शब्दांनी मंचावर उपस्थित प्रत्येकाच्या मनाला स्पर्श केला. प्रेक्षकांपासून सहकलाकारांपर्यंत सर्वजण त्याच्या सकारात्मकतेने भारावून गेले.
हे पण वाचा.. “Shivani Sonar : घोडबंदरच्या ट्रॅफिकमुळे जुळलं खास बॉण्डिंग, खरी बंदूक हातात घेतल्याचा अनुभवही सांगितला”
Gaurav More आज हसतखेळत प्रेक्षकांना खळखळून हसवतो, पण या हास्यामागे वर्षानुवर्षांची कष्टाची कहाणी आहे. लहानपणापासून अभिनयाची आवड असलेल्या गौरवला सुरुवातीला अनेक ठिकाणी नकाराचा सामना करावा लागला. अनेक वेळा अपमान सहन करावा लागला, पण त्याने कधीही हार मानली नाही.
त्याच्या या संघर्षाला आज यशाची गोडी लागली आहे. ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ ही ओळख मिळाल्यानंतर तो प्रत्येक घराघरात पोहोचला. विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांना हसवतानाच त्याने जीवनातील सकारात्मक दृष्टीकोन सर्वांसमोर ठेवला आहे.
हे पण वाचा.. Devmanus फेम Kiran Gaikwad चा सेटवरील अनुभव व्हायरल; पत्नी वैष्णवी कल्याणकरच्या कमेंटने वेधले लक्ष
Gaurav More चा प्रवास केवळ एका अभिनेत्याची कहाणी नाही, तर प्रत्येक सामान्य माणसाला प्रेरणा देणारा आहे. अपमान सहन करून, टोमणे ऐकून देखील हसतमुख राहणं ही खरी ताकद आहे, हे गौरवने आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे.
आज तो फक्त विनोदवीर नाही, तर प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरला आहे. ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर त्याने व्यक्त केलेले शब्द हे केवळ मनोरंजनापुरते नसून, जीवन जगण्याचं एक धडे देणारे होते.









