ADVERTISEMENT

71st National Film Awards : मराठी सिनेमांचा राष्ट्रीय पुरस्कारांवर ठसा या चित्रपटांना मिळाला मोठा सन्मान!

71st National Film Awards : ७१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी सिनेमांचा दबदबा पाहायला मिळाला. सुजय डहाकेच्या 'श्यामची आई'ने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा सन्मान पटकावला, तर 'नाळ २' बालचित्रपट ठरला. चिमुकली त्रिशा ठोसरला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कारही मिळाला.
National Film Awards

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या (71st National Film Awards) ७१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची नुकतीच घोषणा झाली असून, यंदाचा सोहळा मराठी चित्रपटासाठी अभिमानास्पद ठरला आहे. विविध भाषांतील कलाकृतींमध्ये मराठी चित्रपटांनी आपला ठसा उमठवत एकापेक्षा एक महत्त्वाचे पुरस्कार पटकावले आहेत.

दिग्दर्शक सुजय डहाके दिग्दर्शित ‘श्यामची आई’ या सिनेमाला यंदाचा “सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट” म्हणून गौरवण्यात आलं आहे. साने गुरुजी यांच्या अमर आत्मचरित्रावर आधारित या सिनेमाने रसिकांचं मन जिंकलं होतंच, आता त्याला राष्ट्रीय पुरस्काराच्या रूपात अधिकृत मान्यता मिळाली आहे. विशेष म्हणजे याच नावाच्या सिनेमाला १९५३ मध्ये First National Film Awards मिळाला होता. त्यामुळे ७० वर्षांनंतर याच कथानकाचा गौरव होणं, ही एक ऐतिहासिक पुनरावृत्ती ठरली आहे.

श्यामची आई’मध्ये संदीप पाठक, गौरी देशपांडे, ओम भूतकर, शर्व गाडगीळ, सारंग साठ्ये, मयूर मोरे, ज्योची चांदेकर आणि सुनील अभ्यंकर यांसारख्या कसलेल्या कलाकारांनी अभिनयाची बहार दिली. सिनेमात साने गुरुजींच्या विचारांची साद आणि मातृत्वाचं नितळ दर्शन प्रेक्षकांना भावलं.

त्याचबरोबर ‘नाळ २’ या बालचित्रपटालाही मोठा सन्मान मिळाला आहे. हा सिनेमा सर्वोत्कृष्ट बालचित्रपट ठरला असून, यात मुख्य भूमिकेत असलेल्या चिमुरडी त्रिशा ठोसरला “सर्वोत्कृष्ट बालकलाकार” म्हणून गौरवण्यात आलं आहे. त्रिशाच्या सहज अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं आणि त्याचीच पावती राष्ट्रीय पातळीवर मिळाली आहे.

हे पण वाचा..Chhaya Kadam कोकणात रमल्या; साधेपणाने जिंकली मने, खास क्षण चाहत्यांसोबत शेअर

याशिवाय, आशीष बेंद्रे यांना ‘आत्मपॅम्फ्लेट’ या सिनेमासाठी ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक’ पुरस्कार मिळाला आहे. अशा प्रकारे नवोदितांना मिळालेला हा मान खूप प्रेरणादायी आहे.

National Film Awards मध्ये मेकअपच्या श्रेणीतही मराठी कलाविश्वाची छाप दिसली. श्रीकांत देसाई यांना ‘सॅम बहादूर’ या सिनेमासाठी “सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट” हा पुरस्कार मिळाला. तसेच, वेशभूषा विभागातही सचिन लोवळेकर यांचा समावेश असून त्यांनी ‘सॅम बहादूर’साठी मिळवलेला पुरस्कार ही मराठी कलावंतांची शान वाढवणारी बाब आहे.

71st National Film Awards या पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टी सोबतच हिंदी चित्रपट सृष्टीतील शाहरुख खान (‘जवान‘) आणि विक्रांत मॅसी (‘12th फेल‘) यांना संयुक्तपणे सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार मिळाला आहे. तर राणी मुखर्जीला (‘मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे‘) सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून गौरवण्यात आलं.

हे पण वाचा..Prathamesh Parab चा मुंबई लोकलमधील विनातिकीट प्रवास; टीसीकडून मिळाली अनोखी शिक्षा!

मराठी चित्रपटसृष्टीसाठी हे यश केवळ गौरवाचेच नव्हे, तर प्रेरणेचेही कारण आहे. विविध विषय, दर्जेदार मांडणी आणि प्रगल्भ अभिनयाच्या जोरावर मराठी सिनेमाने पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर आपली ताकद सिद्ध केली आहे.